Amit Shah | Revanth Reddy | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा फेक व्हिडिओ जारी करण्यात आल्याच्या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी एफआरआर दाखल केली आहे. या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी तेलंगणाचे कॉंग्रेसचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनाही नोटीस बजावली आहे. त्यांना १ मे रोजी आपली बाजू मांडण्यास सांगण्यात आले आहे.
रेड्डी यांना आपला फोनही सोबत आणण्याचे निर्देश दिल्ली पोलिसांनी दिले आहेत. सूत्रांच्या म्हणण्यानुसार रेड्डी यांच्या फोनची तपासणी केली जाणार आहे. रेवंत रेड्डी यांनीच त्यांच्या एक्स अकाउंटवरून अमित शहा यांचा व्हिडिओ शेअर केला होता.
तेलंगणा कॉंग्रेस पक्षाच्या अधिकृत अकाउंटरवरून तसेच कॉंग्रेसच्या अनेक नेत्यांच्या अकाउंटवरून व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. एडिट करण्यात आलेल्या या व्हिडिओत अमित शहा एससी-एसटी आणि ओबीसी यांचे आरक्षण संपुष्टात आणण्याबाबत बोलताना दिसत आहेत.
तथापि, शहा हे कर्नाटकात मुस्लिमांना जे आरक्षण देण्यात आले होते ते संपुष्टात आणण्याबाबत बोलत होते असे फॅक्ट चेक मध्ये आढळून आले आहे. एडिट केलेल्या व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांकडे २८ एप्रिल रोजी तक्रार दाखल करण्यात आली होती.
भारतीय जनता पार्टी आणि गृहमंत्रालयानेही यासंदर्भात तक्रार दिली होती. हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करणाऱ्या सगळ्यांनीच देशभरात कारवाईला सामोरे जाण्यासाठी आता तयार राहीले पाहिजे असे भाजपच्या आयटी विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी म्हटले आहे.
दरम्यान, या प्रकरणात आसाममध्ये रितोम सिंह नावाच्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली असल्याचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांनी सांगितले.