पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – सोलापूर रेल्वे विभागाअंतर्गत असलेला दौंड जक्शन आणि दौंड- अंकाई रेल्वे मार्ग 1 एप्रिलपासून पुणे विभागात आला आहे. त्यानुसार पुणे विभागाकडून या मार्गावरील सर्व रेल्वे स्थानकासह मार्गिकेचा पाहणी दौरा करण्यात येत असून, या दौऱ्यानंतर स्थानकासह मार्गिकेवरील आवश्यक कामांचा अहवाल तयार करून पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
दौंड ते अंकाई हा 220 किलोमीटरचा भाग आता रेल्वेच्या पुणे विभागात आला आहे. यासंदर्भातील रेल्वे बोर्डाने आदेश काढला होता. त्यानुसार मागील एक महिन्यांपासून या मार्गावरील सर्व प्रक्रिया पार पाडली जात होती. दरम्यान, १ एप्रिलपासून सोलापूर रेल्वे विभागातून सुरू असलेले रेल्वेचे संचलन आता पुणे विभागातून सुरू झाले असून, पुणे रेल्वे व्यवस्थापकीय कार्यालयाच्या इमारतीमध्ये नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे.
नवीन मार्गाची माहिती करून घेण्यासाठी पुणे रेल्वे विभागाच्या व्यवस्थापक इंदू दुबे, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे, डॉ. रामदास भिसे व इतर अधिकाऱ्यांनी बुधवारी मार्गाला भेट दिली. त्या वेळी त्यांनी मार्गावरील स्थानक, तेथील सुविधा व इतर गोष्टी जाणून घेतल्या. गुरुवारीदेखील या मार्गाची पाहणी अधिकाऱ्यांकडून करण्यात आली.
या पाहणी दौऱ्यामध्ये कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, येवला आणि शिर्डी स्थानकांची पाहणी करण्यात आली आहे. त्यामध्ये स्थानकांची स्थिती, तेथील प्रवासी सुविधा, रेल्वे मार्ग, सिग्नलिंग, नवीन मार्गांची रचना यांसह अन्य बाबी या दौऱ्यात पाहण्यात येणार आहेत. तसेच आवश्यक त्या सूचनाही रेल्वे अधिकाऱ्यांकडून करण्यात आल्या.
स्थानकांत सुधारणांची गरज
अमृत भारत योजनेअंतर्गत या मार्गावरील कोपरगाव, बेलापूर, दौंड आणि अहमदनगर रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. त्याचीही पाहणी करण्यात आली असून, त्यात अनेक सुधारणा करणे गरजेचे आहे. त्याचाही अहवाल तयार करून टप्प्याटप्प्याने सुधारणा केल्या जातील, असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.