अहमदनगर (नेवासा) : कुकाणा (ता.नेवासा) येथील हॉटेल यशदिपमध्ये जेवण्यासाठी आलेल्या दोन जणांनी बील देण्याच्या कारणावरुन झालेल्या वादात हॉटेल चालकाच्या पोटात चाकू खुपसून जखमी केल्याची खळबळजनक घटना शनिवार (दि.९) घडली.
सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेची माहीती मिळताच नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक धनंजय जाधव यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमीला औषधोपचारासाठी नगर येथे हलविण्यात आले.दोन्ही हल्लेखोरांना पोलीसांनी ताब्यात घेतल्याची माहीती पोलीस निरिक्षक धनंजय जाधव यांनी दिली.
कुकाणा येथे असलेल्या हॉटेल यशदिपमध्ये जेवन करण्यासाठी आलेल्या साहिल बशीर पठाण व जाफर बशीर सय्यद या दोन जणांचे बील देण्यावरून वाद झाला. या वादात हॉटेलचे संचालक अतुल राजेंद्र उर्फ राजकुमार खाटीक यांच्या पोटात चाकू खुपसण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी दोन्हही हल्लेखोरांवर कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले.
दोघांवर नेवासा पोलीस ठाण्यात भा.द.वी.कलम ३०७, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहीती पो.नि.जाधव यांनी दिली. तसेच नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस पथक कुकाणा येथे कायदा व सुव्यवस्थेवर लक्ष ठेवून असल्याचे त्यांनी म्हंटले.