जाधववाडी, (वार्ताहर) – पिंपरी-चिंचवड शहरात सर्वत्रच फॅन्सी नंबरप्लेट दुचाकी, चारचाकीवर दिसत आहेत. कारवाईत तत्परता न दाखविल्याने अनेक ठिकाणी या नंबर प्लेट्स वाहनांवर झळकत आहेत.सध्याचे नवीन फॅड असे आहे की वाहनावर नंबर अतिशय बारीक अक्षरात लिहिले जातात ते धड डोळ्यांना सहजासहजी दिसत नाही. एखादा अपघात झाला तर वाहनचालक पळून जातो वाहनावरील नंबर दिसत नसल्याने पोलिसांना कळवणे मोठे जिकरीचे काम बनते. परंतु आरटीओकडून सध्या फॅन्सी वाहनचालकांवर कारवाई करण्यात येत आहे.
बॉस, ताई, दादा, बाबा, नाना या सर्वांनी लक्षात ठेवा, वाहनावर सजावटी नंबरप्लेट म्हणजेच फॅन्सी नंबरप्लेट लावल्यास आपल्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. तसेच एक हजार रुपये दंड आकारला जाऊ शकतो. गेल्या काही वर्षांपासून गाड्यांवर फॅन्सी नंबरप्लेट लावण्याचा एक ट्रेंड सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी कारवाईचा इशारा दिला आहे.
मोटार वाहन कायदा 1988 तसेच मोटार वाहन नियम 1989 नुसार वाहनांवर फॅन्सी नंबरप्लेट लावणे अवैध आहे. तरीही शहरात असंख्य वाहनचालकांची भाईगिरी सुरू आहे. गुन्हेगारी कारवायांमध्ये वापरण्यात येणार्या वाहनांची ओळख पटू नये म्हणून फॅन्सी नंबरप्लेट लावल्या जातात. स्वतः आणि गाडीची ओळख लपविण्यासाठी गाडीच्या क्रमांकाला आई, भाईचा आकार देणार्या वाहनचालकांचा सुळसुळाट वाढत आहे.
दादा, मामा, काका, साई, राम, पवार अशा नावांचे नंबर जुळवलेली वाहने वेगवेगळ्या ठिकाणी पाहायला मिळतात. जे अशा प्रकारच्या नंबरप्लेट वापरातील त्या वाहनधारकासांठी महाराष्ट्र पोलिसांची ही धोक्याची घंटा आहे. असे वाहन वापरत असाल तर आताच सावधान व्हा, कारण ज्यांच्या वाहनांच्या नंबरप्लेट फॅन्सी आहेत, अशा वाहन चालक अन् दुचाकीस्वारांच्या विरोधात वाहतूक पोलिसांनी खास मोहीम राबवली आहे.
दहा हजार रुपयांपर्यंतचा दंड
नवीन नियमानुसार भारत सरकारने जुन्या वाहनांसह सर्व उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट आणि रंग कोडेड स्टिकर्स लावणे अनिवार्य केले आहे. वाहनावर हाय सिक्युरिटी नंबरप्लेट नसल्यास पाच हजार ते दहा हजार रुपयांपर्यंतचा दंड ठोठावला जाऊ शकतो. केंद्र सरकारने हाय सिक्युरिटी नंबर प्लेट्स बसविण्यासाठी 31 डिसेंबर 2022 ही मुदत दिली होती. 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी केलेल्या सर्व वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट आणि कलर कोडेड स्टिकर असणे आवश्यक आहे.
हाय सिक्युरिटी नंबरप्लेट्स म्हणजे काय?
उच्च सुरक्षा, नाव, क्रमांक प्लेट या अॅल्युमिनियमपासून बनवलेल्या नंबरप्लेट असतात. नंबरप्लेट ही कमीत कमी दोन न वापरता येण्याजोग्या स्नॅप अनलॉकद्वारे वाहनांवर निश्चित केल्या जातात. याचा फायदा असा की, जी वाहनातून सहज काढता येत नाही किंवा काढल्यानंतर दुसरी नंबरप्लेट लावता येत नाही.
नंबरप्लेटमध्ये वरच्या डाव्या कोपर्यात निळ्या रंगात अशोक चक्राचा हॉटस्टार केलेला क्रोमियम आधारित 20 मिमी बाय 20 मिमी होलोग्रम आहे. तर हाय सेक्युरिटी नंबरप्लेट ची किंमत दुचाकींसाठी सुमारे 400 रुपयांपासून सुरू होते. तर श्रेणीनुसार चारचाकींसाठी 1 हजार 100 रुपयांपर्यंत जाते. कलर कोडे स्टिकर घेण्यासाठी मालकाला शंभर रुपये द्यावे लागतात.