वडापुरी, (वार्ताहर)- इंदापूर तालुक्यातील सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या व उजनी धरणाच्या समोरील पुलालगत पुणे-सोलापूर महामार्गावर हिंगणगावच्या हद्दीत सकल मराठा समाजाच्या वतीने शनिवारी (दि. 24) रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सुमारे तासभर चाललेल्या या आंदोलनामुळे रस्त्याच्या दुतर्फा लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर हिंगणगाव या ठिकाणी सकल मराठा समाजाच्या वतीने सकाळी अकराच्या सुमारास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शेतकरी बैलगाडीसह महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी इंदापूर पोलिसांनी या ठिकाणी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता. पुणे व सोलापूर मार्गाकडून येणारी वाहतूक यावेळी ठप्प झाली होती.
मराठा समाजाला 50 टक्क्यांच्या आतून ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावं यासोबतच राज्य सरकारने काढलेल्या सगेसोयरे या अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर करण्यात, यावे आणि त्याची अंमलबजावणी करावी अशी प्रमुख मागणी घेऊन हे आंदोलन करण्यात आले. यावेळी ”एक मराठा लाख मराठा”, ”कोण म्हणतो देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही”, ”मनोज जरांगे पाटील आप आगे बढो हम तुम्हारे साथ है, ” अशी घोषणाबाजी करण्यात आली.
सकल मराठा समाजाने 24 फेब्रुवारीपासून आपापल्या भागात सकाळी साडेदहा वाजल्यापासून दुपारी दीड वाजेपर्यंत आणि सायंकाळी चार वाजल्यापासून सहा वाजेपर्यंत रास्ता रोको करत सरकारला जेरीस आणण्याचे आवाहन जरांगे पाटील यांनी केले. त्यानुरूप इंदापूर सकल मराठा समाजाकडून आंदोलन करण्यात आले. दरम्यान, यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली होती.