वाघोली, (प्रतिनिधी)- लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाघोली चौकीसमोर एका युवकाने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी अप्पर पोलीस आयुक्तांनी अपमानास्पद वागणूक दिल्याबद्दल तीन पोलीस कर्मचार्यांचे निलंबन केले. हे प्रकरण ताजे असतानाच लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील केसनंद चौकीत एका पोलीस अधिकार्याने तक्रार अर्जाच्या चौकशीकामी नागरिकाला अपमानास्पद वागणूक दिल्याचा प्रकार उघडकीस आला असून याची ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे.
वाडेबोलाई येथील अमोल पायगुडे यांनी त्यांच्या आईच्या सोन्याच्या चार बांगड्या व इतर पैसे घेऊन एक सोनार फसवणूक करून फरार झाल्याबाबतचा 29 जानेवारी रोजी तक्रार अर्ज लोणीकंद पोलीस ठाण्यात दिला होता. या तक्रारीच्या अनुषंगाने तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांच्याशी संपर्क साधून याप्रकरणी मदत करण्याची विनंती केली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी केसनंद चौकीच्या एका अधिकार्याला याप्रकरणी चौकशी करून मदत करण्याचे सांगितले होते.
संबंधित तक्रारदार पोलीस चौकीत गेल्यानंतर त्या अधिकार्याने अनेक खडे बोल सुनावत तक्रारदाराचा अपमान करून त्यालाच कारवाईचा धाक दाखवल्याची ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होत आहे. संबंधित सोन्याच्या व्यापार्याने तीन चार जणांची फसवणूक केल्याचे देखील उघड झाले. चौकशीकामी जबाब घेण्यासाठी पोलिसांकडून दिल्या जाणार्या वागणुकीबद्दल अमोल पायगुडे यांनी नाराजी व्यक्त करत वरिष्ठांनी याबाबत लक्ष घालून चौकशी करण्याची मागणी केली आहे.
सोन्याच्या दुकानदाराकडून केलेल्या फसवणुकीबाबत तातडीने चौकशी होऊन पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई येणार आहे. तसेच पोलीस अधिकार्याकडून नागरिकांना दिलेल्या वागणुकीबद्दल देखील तातडीने चौकशी करण्यात येईल.- संजय पाटील, सहायक पोलीस आयुक्त, येरवडा विभाग पुणे