नगर, (प्रतिनिधी) – तोफखाना पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेले एस. एस. मोबाईल शॉपीचे दुकान फोडून 69 हजाराची रोकड चोरून नेली. सदरची घटना बुधवारी (दि. २१) पहाटे दोन ते तीनच्या दरम्यान घडली. याप्रकरणी किरण गणेश कासार (वय ३६ रा. भिंंगारदिवे मळा, भुतकरवाडी, सावेडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कासार यांचे आकाशवाणी केंद्रासमोर, साई पॅलेसमध्ये एस. एस. मोबाईलचे दुकान आहे. त्यांच्याकडे पाच कामगार काम करतात. कासार यांनी मंगळवारी (दि.२०) रात्री नऊ वाजता दुकानातील पैसे ड्राव्हरमध्ये ठेऊन त्याला लॉक लावले व दुकानाचे शटर व्यवस्थित बंद करून घरी गेले होते.
दुसर्या दिवशी बुधवारी सकाळी साडेआठच्या सुमारास दुकान फोडीचा प्रकार लक्ष्यात आला. कासार यांनी दुकानात पाहणी केली असता दुकानातील मोबाईलची व वस्तूंची उचकापाचक झाल्याचे लक्ष्यात आले. ६९ हजार रूपयांची रोकड चोरीला गेल्याचे लक्ष्यात आले. त्यांनी तोफखाना पोलिसांना माहिती दिली.
दरम्यान दुकानातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता तोंडाला काळ्या रंगाचे मास्क बांधलेला एक इसम ड्राव्हरमधील रोकड चोरून नेहत असल्याचे दिसून येते. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.