सातारा, (प्रतिनिधी) – राज्य सरकारने सातारा जिल्हा नियोजन समितीवरील नामनिर्देशित आणि विशेष निमंत्रित अशा 14 सदस्यांची नियुक्ती पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या शिफारशींनुसार गुरुवारी केली. नवनियुक्त सदस्यांमध्ये विधिमंडळ किंवा संसद सदस्यांमधून निवडण्यात येणारे दोन, जिल्हा नियोजनचे ज्ञान असलेले चार, असे एकूण सहा नामनिर्देशित आणि आठ विशेष निमंत्रित सदस्य आहेत.
नामनिर्देशित सदस्य म्हणून कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष ना. महेश शिंदे आणि आ. जयकुमार गोरे यांचा समावेश करण्यात आला आहे. विशेष निमंत्रित सदस्यांमध्ये राहुल प्रकाश बर्गे (कोरेगाव), संतोष जाधव (जळगाव, ता. कोरेगाव), अभयसिंह घाटगे (बुध, ता. खटाव), जयवंत शेलार (कोयनानगर, ता. पाटण), चंद्रकांत जाधव (तासगाव, ता. सातारा), वासुदेव माने (रहिमतपूर, ता. कोरेगाव), शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव (अतिट, ता. खंडाळा) आणि रणजित भोसले (सातारा) यांचा समावेश आहे. जिल्हा नियोजनाचे ज्ञान असलेले सदस्य म्हणून भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम (पुसेसावळी, ता. खटाव), प्रदीप साळुंखे (किवळ, ता. कराड), माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र यादव (कराड), प्रदीप माने (शिरवळ) यांचा समावेश करण्यात आला आहे.
या आधी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने सातारा जिल्हा नियोजन समितीवर नामनिर्देशित आणि विशेष निमंत्रित सदस्यांच्या नियुक्त्या केल्या होत्या. जून 2022 च्या अखेरीस महाविकास आघाडी सरकार कोसळून, भाजप व शिवसेना यांचे सरकार राज्यात सत्तेवर आले. महाविकास आघाडी सरकारने केलेल्या जिल्हा नियोजन समिती सदस्यांच्या नियुक्त्या नवीन सरकारने रद्द केल्या होत्या. त्यामुळे मागील सहा महिन्यांपासून जिल्हा नियोजन समितीच्या नामनिर्देशित आणि विशेष निमंत्रित सदस्यांच्या जागा रिक्त होत्या.