नवी दिल्ली : संसदेच्या लोकसभा सभागृहात घुसखोरी केल्यानंतर या प्रकरणाने देशभरात खळबळ उडाली. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली आहे. सध्या त्यांची सखोल चौकशी केली जात असून याप्रकरणी मोठे खुलासे होत आहेत. संसदेच्या सुरक्षेतील त्रुटींबाबत दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या तपासाला वेग आला आहे. या क्रमाने तपास पथकाने सर्व आरोपींचे मोबाईल राजस्थानमधून जप्त केले आहेत.
हे सर्व फोन जळालेले आहेत. यासह आरोपींचे बूट, कपडेही पोलिसांनी जप्त केले आहेत. यासह काही कागदपत्रांचाही समावेश आहे. घुसखोरीचे प्रकरण घडले तेव्हा ही कागदपत्र आरोपींकडे होती असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. हा गुन्हा करण्यापूर्वी सर्व आरोपींचे फोन मास्टरमाइंड ललित झा याने काढून घेतले होते. राजस्थानला पळून जाताना त्याने त्या तोडल्या आणि जाळल्या. चौकशीदरम्यान पोलिसांना ललितकडून या फोन्सचे लोकेशन मिळाले असून ते जप्त करण्यात आले आहेत.
ललित झा हा योजनेतील प्रमुख सुत्रधार असून त्याने सर्वच आरोपींचे फोन आपल्याकडे ठेऊन घेतले होते, जे नंतर जाळून टाकले होते. तपासादरम्यान आरोपींनी इन्स्टाग्रामवर तयार केलेल्या भगतसिंग फॅन पेजवरून एकमेकांना भेटले होते. तपासादरम्यान हे पेज देशभक्त88 नावाच्या हँडलने तयार केल्याचे समोर आले. यासोबतच या पेजमध्ये देशातील तरुणांना जोडण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. पेजवरील एका पोस्टमध्ये असे म्हटले आहे की ते लोक भाजप आणि काँग्रेसशी संबंधित नाही. त्यांना क्रांती करायची आहे आणि त्यासाठी तरुणांनी त्याला साथ दिली पाहिजे. आतापर्यंत या लोकांनी अनेक तरुणांचे ब्रेनवॉश करून त्यांना आपल्यासोबत सामावून घेतल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
Parliament Security Breach | According to the Police, phone parts of all the accused have been recovered from Rajasthan. All the phones were found in burnt condition. Lalit Jha had the phones of all the accused: Delhi Police Sources pic.twitter.com/8i08wkLc0N
— ANI (@ANI) December 17, 2023
संसदेत घुसखोरी केल्याप्रकरणी मुख्य सूत्रधार ललित झा याच्यासह एकूण सहा जणांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी भाजपचे खा. प्रताप सिन्हा यांचाही जबाब नोंदविण्यात येऊ शकतो. संसदेतील सुरक्षेचा भंग केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या चार जणांवर दहशतवादविरोधी कायदा (UAPA) व्यतिरिक्त भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली आरोप ठेवण्यात आले आहेत. आरोपी संसदेत पोहोचण्यापूर्वी गुरुग्राममध्ये विशाल शर्मा ऊर्फ विकी याच्या घरी थांबले होते. याप्रकरणी सागर शर्मा, मनोरंजन डी, अमोल शिंदे आणि नीलम देवी या चारही आरोपींना ७ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
नेमकं काय घडलं होत?
संसदेच्या लोकसभा सभागृहात 13 डिसेंबरला लोकसभेत दोन तरुणांनी घुसखोरी केली. प्रेक्षक गॅलरीतून उड्या टाकत दोन तरुण खासदारांच्या आसनांवरुन धावले. याचवेळी आणखी दोन तरुण संसदेबाहेर घोषणाबाजी करत होते. त्यांनी स्मोक कँडल्स पेटवल्या. यावेळी मास्टरमाईंड ललित तिथेच होता. चार आरोपींना अटक होताच तो तिथून पळाला. त्यानं राजस्थान गाठलं. तो महेशच्या घरी गेला आणि त्याने सर्व आरोपींचे मोबाईल तोडले आणि त्यानंतर तुकडे पेटवून दिले. या घटनेनंतर फरार झालेला ललित झा याने स्वतःहून दिल्लीतील कर्तव्य पथ पोलीस स्थानकात गुरुवारी आत्मसमर्पण केले. या मोबाइलचे पुरावे आता पोलिसांच्या हाती लागले आहेत.