नगर – मलनिःसारण प्रकल्प, अमरधामसह बुरुडगाव व सावेडी कचरा डेपोमध्ये उभारण्यात येणाऱ्या दोन मेगावॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प, सहकार सभागृह ते महात्मा फुले चौक रस्त्याची निविदा यासह विविध 25 विषयांना महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत सोमवारी चर्चेविना मंजुरी देण्यात आली.
महापौर रोहिणी शेंडगे यांचे सासरे व माजी नगरसेवक संजय शेंडगे यांचे वडील छगनराव रभाजी शेंडगे यांचे, तसेच आयुक्त पंकज जावळे यांच्या आजीचे निधन झाल्याने सभागृहात त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कोणत्याही विषयांवर चर्चा न करता आठ मिनिटात सर्व विषय मंजूर करून सभा संपली.
स्थायी समितीचे सभापती गणेश कवडे यांनी सभेच्या सुरुवातीलाच स्व. शेंडगे यांच्या श्रद्धांजलीचा प्रस्ताव मांडला. श्रद्धांजली वाहण्यात आल्यानंतर मागील सभेचे इतिवृत्त कायम करण्यात आले. त्यानंतर इतर सर्व विषय मंजूर करण्यात आले. सभेस नगरसेवक मुदस्सर शेख, प्रदीप परदेशी, राहुल कांबळे, सुनील त्रिंबके, रुपाली वारे, सुनीता कोतकर, सुवर्णा गेनाप्पा, मंगल लोखंडे आदींसह अधिकारी, विभागप्रमुख उपस्थित होते. दरम्यान, सभेत सभापती कवडे यांनी महापालिका आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी उभारण्यात आलेला चौथरा व पुतळ्याच्या कामाची माहिती मागवली. सर्व विभागांची शासकीय मंजुरी मिळालेली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांकडे याची माहिती सादर करण्यात आली. त्यांच्या स्तरावर समितीची बैठक होऊन अंतिम परवानगी मिळेल. चौथरा अंतिम टप्प्यात असल्याचे शहर अभियंता यांनी सांगितले. येत्या 15 दिवसात हे काम पूर्ण करा. पुढील महिन्यात सर्वांचा कार्यकाळ संपणार आहे. त्यापूर्वी या पुतळ्याचे अनावरण केले जाणार आहे. त्यादृष्टीने नियोजन करावे, अशा सूचना कवडे यांनी दिल्या.