America Attack On Irani : अमेरिकेने सीरियातील इराणी सैन्याच्या दोन ठिकाणांवर हवाई हल्ला करत इथली ठिकाणं उद्ध्वस्त केल्याची माहिती समोर आली आहे. ही दोन्ही ठिकाणं इराणमधील इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड कॉर्प्स आणि इराणचा पाठिंबा असलेल्या गटांची होती. इराक आणि सीरियात अमेरिकन सैनिकांवर वांरवार होणाऱ्या हल्ल्यानंतर हे पाऊल उचलल्याचे अमेरिकेकडून सांगण्यात येत आहे.
इराणचा पाठिंबा असलेले काही सशस्त्र गट अमेरिकन सैनिकांवर हल्ला करत असल्याचा आरोप अमेरिकेने काही दिवसापूर्वी केला होता. अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉईड ऑस्टिन म्हणाले होते, “अमेरिकेला कोणताही संघर्ष नको आहे. मात्र, इराणचा पाठिंबा असलेल्या गटांकडून अमेरिकेच्या सैनिकांवर हल्ले होत आहे. ते आम्ही कधीही मेनी करणार नाही आणि हे थांबवले पाहिजेत.” असे म्हटले आहे.
त्यासोबतच “इराण अमेरिकन सैन्यावरील या हल्ल्यांमध्ये त्यांचा सहभाग लपवू इच्छित आहे. मात्र, आम्ही त्यांना सोडणार नाही. जर इराणचा पाठिंबा असलेल्या या गटांकडून हल्ला होत राहिला, तर आम्ही आमच्या लोकांचं संरक्षण करण्यासाठी पुढील पाऊल उचलण्यासाठी संकोच करणार नाही,” असा थेट इशारा ऑस्टिन यांनी दिला होता.
यावेळी ऑस्टिन म्हणाले, “अमेरिकेच्या सैनिकांवर हल्ला करणारे गट वेगळे आहेत. तसेच सध्या चालू असलेल्या इस्रायल हमास युद्धाशी त्याचा संबंध नाही. यामुळे अमेरिकेची इस्रायल-हमास युद्धावरील भूमिका बदलणार नाही.” असे म्हणत अमेरिकेने या हल्ल्यांचा इस्रायल-हमास युद्धाशी संबंध नसल्याचेही स्पष्ट केले.