कोलकाता – आता तृणमुल कॉंग्रेसच्या खासदार नुसरत जहॉं या देखील ईडीच्या रडारखाली आल्याअसून एका प्रकरणात ईडीने त्यांना पुढील आठवड्यात कोलकाता कार्यालयात हजर राहण्याचा आदेश दिला आहे. शहराच्या पूर्वेकडील न्यू टाऊनमध्ये ज्येष्ठ नागरिकांना फ्लॅटचे आश्वासन देऊन त्यांची फसवणूक केल्याच्या प्रकरणातील त्यांच्या कथित सहभागाच्या चौकशीच्या अनुषंगाने ही नोटीस जारी करण्यात आली आहे.
नुसरत जहॉं यांना 12 सप्टेंबर रोजी केंद्रीय एजन्सीसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. नुसरत यांनी एक पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणातील आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, ज्या कंपनीवर ज्येष्ठ नागरीकांना फसवल्याचा आरोप आहे, त्या कंपनीच्या व्यवहाराशी आपला काहीच संबंध नाही.
आपण सन 2017 मध्ये या कंपनीच्या संचालकपदाचा राजीनामा दिला आहे असेही त्यांनी म्हटले आहे. याच कंपनीकडून आपण कर्ज घेतले होते व ते कर्ज आपण सन 2017 मध्येच व्याजासह परत केले आहे असेही त्यांनी म्हटले आहे.