पुणे – घरातील एक सदस्य आजारी पडला की, घरात एकापाठोपाठ एक सदस्य आजारी पडत आहेत. यात ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी या आजारांचे रुग्ण शहरात वाढत आहेत. “व्हायरल इन्फेक्शन’ची ही साथ असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत. पुणे मनपा कार्यक्षेत्रात जुलैमध्ये डेंग्यूचे 225 संशयित सापडले. तर, 18 रुग्णांना डेंग्यूची लागण झाली. याबाबतच्या सर्वेक्षणात डासांची पैदास होणाऱ्या 704 ठिकाणी कारवाई करून संबंधितांना नोटीस बजाविण्यात आली.
दरम्यान, ऑगस्टमध्येही हे रुग्ण वाढत असून, आठवड्यात 31 संशयित आढळले आहेत. पावसाळ्यात विषाणूजन्य आजारांत झपाट्याने वाढ होते. त्यात एन्फ्लूएंझा विषाणू पुन्हा सक्रीय झाल्यामुळे लहान मुलांना ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे दिसून येत आहेत. त्यामुळे रुग्णालयांच्या “ओपीडी’ रुग्णांनी भरलेल्या दिसून येत आहे.
“लहान मुलांमध्ये सर्दी, खोकला, ताप लक्षणे दिसल्यास तत्काळ उपचार घ्यावेत. वातावरणातील बदलामुळे संसर्गजन्य आजारात वाढ झाली आहे. मुलांना डोळे आले असतील तर विशेष काळजी घ्यावी. त्यांना शाळेत किंवा खेळायला पाठवू नये,” – डॉ. आशिष व्होरा, बालरोगतज्ज्ञ
“व्हायरल इन्फेक्शन आणि डेंग्यूची साथ यामुळे ताप, अंगदुखी अशी लक्षणे असलेल्यांची संख्या वाढली आहे. ताप आणि अंगदुखी जास्त असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने रक्त तपासणी करणे आवश्यक आहे. औषधोपचार घेऊन विश्रांती घेणे महत्त्वाचे.”- डॉ. राजीव अंबड फॅमिली फिजिशियन