बारे खुर्दमध्ये 10 गुंठे क्षेत्रावर 40 रोपांची लागवड; शेतावरच विक्री, 200 रुपये किलो भाव
वीसगाव खोरे- भाटघर धरण पाणलोट क्षेत्रातील इंद्रायणी तांदळाचे आगार असलेल्या बारे खुर्द (ता. भोर) येथील प्रयोगशील शेतकरी सौरभ दत्तात्रय खुटवड आणि अजय दत्तात्रय खुटवड यांनी 2022 मधील मार्च महिन्यात 15 फुट बाय 15 फुट अंतरावर सफरचंदाची लागवड केली. बायप संस्थेने रोपे विनामूल्य दिली. या फळांची विक्री शेतावरच होते असून, 200 रुपये किलो दराने विक्री केली जाते आहे.
2021 मध्ये डोंगर उतारावर असलेले माळरान फोडून सपाटीकरण करून माळरान शेतीकरीता तयार केले. लागण करण्यापूर्वी माळरानाची उभी आडवी नांगरट करून घेतली. सफरचंद लागवडीसाठी 3 फुट बाय 3 फुट चौरस खड्डे घेतले.
4 ते 5 दिवस खड्डे तापून दिले. त्यानंतर खड्डे पाण्याने भरून घेतले, त्यामुळे खड्ड्यातील उष्णता कमी झाली. नंतर शेण खत, निंबोळी पेंड, एसएसपी 10:26:26 खते, गाळाची माती भरून खड्डे भरून घेतल्यानंतर पाणी दिले जमीन वाफशावर आल्यावर एचआरएम 99, गोल्डन डोरसेट, ऍपल ऍना जातीच्या रोपाची 10 गुंठे क्षेत्रावर 40 रोपाची लागवड केली.
लागण केल्यानंतर दर 10 दिवसांनी जीवामृत प्रती झाड एक लीटर या प्रमाणात दिले, तसेच दर 10 दिवसांनी निमार्क आणि दशपर्णी अर्काची फवारणी केल्याने कीड आटोक्यात आणली. पाणीपुरवठा करीता 35 मीटर बाय 45 मीटर येवढे शेत तळे तयार केल आहे ठिबकचा वापर करून पाणी दिले जाते.
प्रतिझाड पाच किलो फळांचे उत्पादन सुरू
दर तीन महिन्याला झाडाची छाटणी केली, तसेच छाटणीनंतर प्रती झाड 1 किलो गांडूळ खत दिले. मार्च 2023 मध्ये छाटणी केल्यानंतर फुल धारणा सुरू झाली. एप्रिलमध्ये फळात रूपांतर झाले आणि जूनमध्ये फळांना रंग येण्यास सुरुवात झाली. सध्या सफरचंद पिकून तयार झाले आहेत. सुनील चव्हाण, धीरज देशमुख, अक्षय माने, ओंकार दळवी यांनी मार्गदर्शन केले. सद्या साधारणतः प्रतिझाड पाच किलो फळे मिळत आहे.
2022 ला झेंडू आंतरपीक
सफरचंद लागवड केल्यानंतर आंतरपीक म्हणून झेंडूची लागवड ऑगस्ट 2022 ला केली लागवड करण्यापूर्वी 3 फुट रुंदीचे गादी वाफे तयार करून गांडूळ खत भरले कलकत्ता जातीच्या रोपाची लागवड केली झेंडूमधून 20 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले.त्यामुळे पाणी, सेंद्रिय खते, सेंद्रिय किटकनाशके यांचा खर्च यातून निघाला. यंदा आंतरपीक म्हणून सोयाबीन घेतले आहे.