संगमनेर – संगमनेरच्या उपअधीक्षक पदाचा शनिवारी सोमनाथ वाकचौरे यांनी पदभार स्वीकारला. सात महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर संगमनेर, अकोले विभागाला विभागीय पोलीस उपअधिकारी मिळाले आहेत. सात महिन्यांपूर्वी पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांची नागपूर येथे उपायुक्त म्हणून बढती मिळाल्याने हे पद रिक्त होते. त्यानंतर शिर्डीचे उपअधीक्षक संजय सातव यांच्याकडे अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला होता.
अखेर सात महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सोमनाथ वाकचौरे यांनी काल शनिवारी संगमनेर उपविभागीय पोलीस अधिकारी पदाचा पदभार स्वीकारला. यावेळी प्रभारी उपअधीक्षक संजय सातव यांनी त्यांचा सत्कार केला. संगमनेर परिसरात अवैध धंद्यांचे जाळे अधिक भक्कम होऊ लागले आहे. त्यात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना बिघडवण्याचे काम छोटे-मोठे क्लब वाले करत आहेत. शहरातील कत्तलखाने बंद करणे तसेच इतर अवैध धंद्यांवर आळा घालणे महत्त्वाचे ठरणार आहे. अनेक वेळा पोलिसांनी छापे टाकूनही कत्तलखाने मात्र जोरात सुरू आहेत.
पोलिसांनी गोमांस जप्त करून आरोपींना तुरुंगात टाकल्यानंतरही कत्तलखाने बंद होण्याचे नाव घेत नाहीत. संगमनेर शहरातील काही भागांमध्ये अजूनही रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात गोहत्या करण्यात येते. त्यात दोन मोठे बोके मोठ्या प्रमाणात जनावरांची कत्तल करून पहाटेच्या वेळी गाड्या भरून शहराबाहेर काढून दिल्या जातात. त्यामुळे शहरातील अवैध कत्तलखाने त्वरित बंद करण्याची मागणी नागरिक करत आहेत. उपअधीक्षक वाकचौरे आता अवैध धंद्यासह कत्तलखान्यांवर काय कारवाई करतात, याकडे लक्ष लागले आहे.