मंचर – भिवंडी येथील पाया गावातुन २७ प्रवासी घेऊन भीमाशंकर येथे देवदर्शनाकरिता निघालेल्या खाजगी मिनी बसला घोडेगाव भीमाशंकर रस्त्यावर घोडेगावजवळील शिंदेवाडी येथे बुधवार दि.१२ पहाटे ०६ :३० वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली . या घटनेत बस , बसची कागदपत्रे पूर्णपणे जळून खाक झाली असून बसमधील सर्व प्रवासी, चालक वाहक असे सर्वजण सुखरूप आहेत.
याबाबत घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी दिलेल्या माहिती अशी की बाबू बसप्पा सुरपूर वय ३० रा. कल्याण डोंबिवली ठाणे हा मंगळवार दि. ११रोजी रात्रौ ११: ३० वा सुमारास भिंवडी येथील पाया गावातील एकुण २७ प्रवासी घेवुन मिनी बस एम एच ०५ डी के ९६९९ घेऊन भिमाशंकर येथे देवदर्शनाकरीता चालले होते. बुधवारी सकाळी ६:३० वाजता घोडेगाव हद्दीत घोडेगाव ते भिमाशंकर जाणाऱ्या रस्त्यावर शिंदेवाडी येथे मिनी बस आली असताना बसने अचानकपणे पेट घेतला. बसने पेट घेताच बसमधील सर्व प्रवासी खाली उतरले. त्यामुळे मोठे दुर्घटना टळली .
त्यावेळी बसमधील चंद्रशेखर गोपाऴ घोलप यांनी डायल ११२ ला संपर्क करून पोलिसांना बस पेटल्याची माहिती दिली. घटनेची माहिती कळताच घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने व त्यांची टीम घटनास्थळी आली. त्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने बसला लागलेली विझवण्याचा प्रयत्न केला .मात्र आगीचा भडका अधिकच वाढल्याने आग विझली नाही. व या आगीत पूर्ण बस जळून खाक झाली तसेच गाडीतील बसची कागदपत्रे,प्रवासी यांच्या काही प्रवासी बॅगा जळून गेल्या आहे. बसला आग कशामुळे लागली याची माहिती पोलीस घेत असल्याची माहिती घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी दिली .याबाबत बस चालक बाबू सुरपुस यांनी घोडेगाव पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार वायाळ करत आहे.