पुणे – रिक्षा चालकांनी केलेल्या मागणीमुळे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने रिक्षा चालकांची भाडेवाढ करण्यासंदर्भातील नुकतेच आदेश काढले आहेत. यानुसार रिक्षा चालकांना आता चार रुपयांनी भाडे वाढ करता येणार आहे. त्यामुळे रिक्षा चालकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
रिक्षा चालकांना ही भाडे वाढ येत्या १ सप्टेंबरपासून लागू होणार असून, पहिल्या एक किलोमीटरच्या टप्प्यासाठी रिक्षा चालकांना २५ रुपये आकारता येणार आहेत. तर पुढील प्रत्येक किलोमीटरसाठी १७ रुपये आकारता येणार आहे. रिक्षा चालकांना पूर्वी पहिल्या टप्प्यातील एक किलोमीटरसाठी २१ रुपये भाडे आकारणी करता येत होती. तर त्या पुढील प्रत्येक किलोमीटरसाठी 14 रुपये भाडे दर आकारणे बंधनकारक होते.
दरम्यान १ सप्टेंबर पासून मीटर पुनः प्रमाणीकरण करून घेतील त्याच ऑटोरिक्षा धारकांकरिता भाडेसुधारणा लागू राहील. मीटर पुनः प्रमाणीकरणकरण्याची मुदत ३१ ऑक्टोंबर पर्यंत आहे. जे ऑटोरिक्षाधारक विहित मुदतीत मीटर पुनः प्रमाणीकरण (Meter Calibration) करून घेणार नाहीत त्यांच्यावर १ ते ४० दिवसांचा परवाना निलंबनाची कारवाई केली जाईल किंवा किमान ५० ते २ हजार रुपयांचा दंड आकारण्यात येईल. (Pune: Rickshaw fare hiked by Rs 4 from September 1)