श्रीगोंदा – तालुक्यातील पेडगाव येथील बहादूर गडावर अज्ञातांनी गुप्तधनाच्या अमिषापोटी पुन्हा उत्खनन केल्याची घटना उघडकीस आली आहे. गडावरील राणी महालातील हमामखान्यात हे उत्खनन करण्यात आले आहे. दरम्यान, या किल्ल्याला रात्रीचे सुरक्षारक्षक नसल्यानेच हे उत्खनन झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे.
पेडगाव येथील बहादुरगडाला मोठा इतिहास असून हा किल्ला छत्रपती संभाजी महाराजांच्या जाज्ज्वल्य स्वाभिमानाचा साक्षीदार आहे. या किल्ल्याची बरीचशी पडझड झाली असली, तरी तटबंदीचा काही भाग, बुरूज, वेशी, मंदिरे, तसेच महालांचे अवशेष अजून तेथे आहेत. पुरातत्व खाते आणि काही दुर्गप्रेमी या किल्ल्याच्या संवर्धनासाठी काम करीत आहेत.
या किल्ल्यावर यापूर्वीही गुप्तधनाच्या अमिषापोटी अनेकदा बेकायदेशीररित्या उत्खनन झालेले आहे. गेल्या काही वर्षांत बेकायदेशीर उत्खननाला आळा बसला होता. मात्र आता पुन्हा एकदा अज्ञातांनी किल्ल्यावर बेकायदेशीररित्या उत्खनन केल्याचे उघडकीस आले आहे. किल्ल्यामधील राणीमहालातील हमामखान्यात चार ते पाच फूट खोल खड्डा खोदण्यात आला आहे. गुप्तधनाच्या अमिषापोटीच हे उत्खनन झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.
“बहादूर गडावर पुरातत्व खात्यामार्फत उत्खननाचे कोणतेही काम सुरू नाही. त्यामुळे किल्ल्यावर केलेले उत्खनन हे कोणीतरी गुप्तधनाच्या अमिषापोटीच केल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. याबाबत वरिष्ठांना कळविणार आहोत.”
– मच्छिंद्र पंडित, सुरक्षारक्षक, बहादूरगड.