सातारा -पर्यटनस्थळाचा “क’ वर्ग दर्जा असलेल्या श्री क्षेत्र चवणेश्वरसाठी नव्याने पर्यटन विकास निधीमधून दोन कोटी 23 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून निधीस नुकतीच प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, आ. दीपक चव्हाण यांच्या माध्यमातून हा निधी मिळाला आहे. या निधीबद्दल चवणेश्वर ग्रामस्थ, भाविक, पर्यटकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
कोरेगाव आणि वाई तालुक्याच्या सीमेवर वसलेल्या चवणेश्वर गावास 2000 मध्ये रामराजे यांच्या माध्यमातून पर्यटनस्थळाचा “क’ वर्ग दर्जा मिळालो. दर्जा मिळूनही अनेक वर्षे हे पर्यटनस्थळ विकासापासून वंचित होते. दोन वर्षापूर्वी चवणेश्वर घाट रस्त्यासाठी 1 कोटी 33 लाखांचा निधी प्रादेशिक पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत शासनाने मंजूर केला. मात्र, करोनाच्या संकटात काही त्रुटींमुळे हा निधी परत गेला होता. याबाबत लोकप्रतिनिधींनी शासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर निधी परत आला.
या रस्त्याचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. चवणेश्वर पर्यटनस्थळ म्हणून विकसित व्हावे यासाठी रामराजे नाईक निंबाळकर, आ. दीपक चव्हाण यांनी नेहमीच प्रयत्न केले. ग्रामपंचायतीचे सरपंच दयानंद शेरे, माजी सरपंच सौ. नीता पवार, सुरेश सुर्यवंशी, संतोष पवार, हरीदास शेरे, युवराज शेरे, शाळा व्यवस्थापक समितीचे अध्यक्ष बजरंग पवार यांच्यासह ग्रामस्थांनी चवणेश्वर गावात विविध योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी पुढाकार घेऊन अनेक कामे मार्गी लावली. करंजखोप ते चवणेश्वर या सात किलोमीटर रस्त्यापैकी तीन किलोमीटर रस्त्यास निधी मिळाला असून उर्वरित रस्त्याचे कामही मार्गी लागावे यासाठी ग्रामस्थांनी पाठपुरावा सुरु ठेवला होता.
याबाबत रामराजे नाईक निंबाळकर व आ. दीपक चव्हाण यांनी आग्रही भूमिका घेत प्रादेशिक पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत रस्ता व उर्वरित अन्य कामांसाठी दोन कोटी 22 लाख 98 हजार रुपयांचा निधी मंजूर केला. या कामाची लवकरच ईटेंडर द्वारे प्रक्रिया होऊन हे काम मार्गी लागणार असल्याने चवणेश्वर ग्रामस्थ, भाविक व पर्यटनांनी रामराजे व आ. चव्हाण यांचे आभार मानले आहेत.
पर्यटनस्थळाचा दर्जा मिळूनही निसर्गसंपदेने नटलेले चवणेश्वर गाव विकासापासून वंचित होते. मात्र, रामराजे नाईक निंबाळकर, संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून आम्ही या गावाचा कायापालट करण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतला. चवणेश्वरचा खऱ्या अर्थाने विकास करायचा असेल तर रस्ता होणे गरजेचे आहे. या रस्त्याच्या कामास प्राधान्य दिले आहे. आगामी काळात पर्यटना वाढीसाठी प्रयत्न करणार आहे.
दीपक चव्हाण, आमदार, फलटण मतदारसंघ