मुंबई – शिवसेनेसाठी पत्रकार परिषद घेतली की स्वतः अडचणीत आहे म्हणून पत्रकार परिषद घेतली. एवढे दिवस सेना भवन आठवले नाही. प्रवीण राऊत यांनी ईडीच्या चौकशीत नाव घेतल्यानेच संजय राऊतांचा थयथयाट सुरू झाला आहे, अशी खोचक टीका भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खुर्चीवर त्यांचा डोळा असल्याचा हल्लाबोल केला.
शिवसेना खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी मंगळवारी शिवसेना भवनावर घेतलेल्या पत्रकार परिषदेवरून राजकीय वातावरण तापले आहे. त्यावर नारायण राणेंनी आज मुंबईत भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेत संजय राऊतांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिले.
नारायण राणे म्हणाले, पत्रकार परिषदेत राज्यसभा खासदार संजय राऊत यांची जी केविलवाणी परिस्थिती झाली होती आणि जो घाम फुटला होता तो विरोधकांनी फोडला का चुकीच्या कामामुळे कृत्यामुळे घाबरुन त्यांना घाम फुटला होता हे सांगण्यासाठी मुद्दाम पत्रकार परिषद घेतली, असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे.
तसेच त्यांनी अनेकवेळा मी कोणाला घाबरत नाही असे सांगितले आहे. मर्दांची शिवसेना आहे. मर्द माणसाला मर्द असल्याची सांगण्याची आवश्यकता नाही. जो घाबरतो तोच सांगत असतो, मी घाबरत नाही, असेही त्यांनी संजय राऊतांना सुनावले.
संजय राऊतांचे लक्ष उद्धव ठाकरेंच्या खुर्चीवर आहे. त्यांना सुपारी मिळाली आहे, यांना हटवा, तुम्हालाच मुख्यमंत्री करतो. उद्धव ठाकरे जेव्हा सरकार स्थापनेबाबत पहिल्यांदा शरद पवारांना भेटायला गेले होते, तेव्हा उद्धव ठाकरेंसोबत संजय राऊत आणि आदित्य ठाकरे होते.
संजय राऊतांची कुंडली माझ्याकडे आहे. मी आज ओळखतो का तुम्हाला? असा आरोप देखील नारायण राणेंनी केला. उद्धवजींना कळत नाहीय हे (संजय राऊत) तुम्हाला सुरुंग लावत आहे. संजय राऊतांना माहिती आहे. आज ना उद्या जागा खाली होणार. आता शिवसेनेत कुणी नाही, मी आहे. आधी शिव्या दिल्या आणि आता गोडवी गातायत, असे देखील राणे म्हणाले.
होय मी प्रखर राष्ट्रवादी आणि राष्ट्रभक्त आहे, आमचा कुठेही डोळा नाही, आमचा फक्त शिवसेनेच्या विस्तारावर डोळा आहे. महाराष्ट्रात आणि देशामध्ये. 2024 पर्यंत शिवसेना दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहचलेली असेल. आणि बरेचसे लोकं तोपर्यंत बेरोजगार झालेले असतील.
– संजय राऊत, शिवसेना नेते