श्रीगोंदा – श्रीगोंदा येथे झालेल्या भीषण अपघातात तीन तरुण मित्रांचा दुर्दैवी अंत झाला आहे. ही दुर्घटना रविवारी रात्री एक वाजेच्या सुमारास घडली. हा अपघात चाकण-जामखेड महामार्गावर रस्त्यात उभे असलेल्या उसाच्या ट्रॅक्टरला कारची धडक बसल्याने घडला.
या अपघातात राहुल आळेकर (वय 22), आकाश खेतमाळीस (वय 19, दोघे रा. श्रीगोंदा) व केशव पांडुरंग सायकर (वय 22, रा. काष्टी) या तीन मित्रांचा मृत्यू झाला. राहुल व आकाश हे दोघे शनिवारी रात्री मित्र केशवला श्रीगोंद्याहून काष्टीला सोडण्यासाठी कारमधून चालले होते. शहराजवळील हॉटेल अनन्या समोर एक उसाचा ट्रॅक्टर ट्रॉली रस्त्यात उभा होता. याप्रसंगी कारची ट्रॅक्टरला जोरात धडकल्याने हा भीषण अपघात झाला.
ही धडक इतकी जोरदार होती की, ऊसाच्या ट्रॉलीचा टायर फुटला आणि कार समोरून पूर्णपणे दबली गेली. ही दुर्घटना घडल्यानंतर नागरिकांनी शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर आतील तिघांना बाहेर काढण्यात यश आले. या तिघांना रुग्णवाहिकेतून तातडीने खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या प्रकरणी ट्रॅक्टर चालकाविरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सकाळी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. राहुल आळेकर याच्यावर आळेकर मळा येथे तर खेतमाळीस याच्यावर पारगाव रोड येथे तर सायकर याच्यावर काष्टी येथे शोकाकूल वातावरण अंत्यविधी पार पडला.
या अपघातातील मयत राहुल आळेकर याचे आजोबा (आईचे वडील) जालिंदर शिंदे (वय 63, रा.घारगाव) हे नातवाच्या अंत्यविधीसाठी येथे आले होते. परंतु, नातवाच्या आकस्मिक निधनाचा धक्का सहन न झाल्याने त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.
ऐन तारुण्यात गेलेला घरातील एकुलता एक मुलगा, त्यातच आजोबांचे निधन या घटनेने आळेकर व शिंदे परिवार दुःखात बुडाला आहे. राहुल हा माजी नगराध्यक्षा सुनीता शिंदे यांच्या भावाचा मुलगा होता. या दोन्ही धक्कादायक घटनेमुळे श्रीगोंदा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
तिघेही एकुलते एक
या अपघातात मयत झालेले आळेकर, खेतमाळीस व सायकर हे तिघे मुले आई-वडिलांना एकुलते एकच होते. राहुल हा अभियंत्रिकीच्या तिसऱ्या वर्षाला शिक्षण घेत होता. दोन दिवसांपूर्वीच त्याचा श्रीगोंद्यात वाढदिवस साजरा झाला होता. मित्र परिवार, नातेवाईक यांनी राहुलचा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा केला होता.