अभिजित कुलकर्णी
गॅस, पवन आणि सौर ऊर्जेचा सध्या वापर वाढला असला तरी गेल्यावर्षी विजेची मागणी पूर्ण करण्यास हे घटक पुरेसे ठरले नाहीत. त्यामुळे जगभरात पर्यावरणवाद्यांचा विरोध असतानाही अनेकांनी पुन्हा कोळशाचा आधार घेतला. 2021 मध्ये कोळशावर चालणाऱ्या औष्णिक विद्युत केंद्राचे उत्पादन नऊ टक्क्याने वाढल्याचे चित्र आहे.
इंधन म्हणून कोळशाचा पुनर्जन्म होण्याची चिन्ह आहेत. जगभरात सर्व देशांनी ग्लोबल वॉर्मिंगशी सामना करण्यासाठी कार्बन उत्सर्जन कमी करण्याचे आश्वासन दिले असले, तरी पृथ्वीवरील सर्वात वाईट इंधन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोळशाला पुन्हा मागणी वाढली आहे. हा घटक ग्रीन हाउस गॅस उत्सर्जनचा प्रमुख स्रोत म्हणून राहिला आहे; परंतु नेहमीच वाईट घडते, असे नाही. ग्रीन एनर्जी आणि कोळशाची मागणीवरून काही चांगल्या बातम्यादेखील आहेत.
आंतरराष्ट्रीय एनर्जी एजन्सीच्या (आयईए) अंदाजानुसार सध्या कोळशाचा वाढता वापर पाहता पुढील तीन वर्षांत कोळशाच्या मागणीत घट होईल, असे वाटत नाही. कोळशाच्या आघाडीवर मावळते वर्ष विक्रमी राहिले, असे मत मांडण्यामागे हे एक प्रमुख कारण आहे. करोनाच्या लाटेतून बाहेर पडण्याचे जगाचे प्रयत्न होत असताना विजेला मागणी वाढणे अपेक्षितच होते. कोळसादेखील अजूनही क्लिन गॅसच्या तुलनेत फायदेशीर आहे.
कोळशाच्या मागणीवरून आयईएने मांडलेल्या लेखाजोखात म्हटले की, 2019 आणि 2020 मध्ये कोळशाची घटलेली मागणी पाहता 2018 मध्ये कोळसा खरेदीचा विक्रम नोंदला गेला असे वाटत होते; परंतु 2021 ने या अपेक्षांवर पाणी फेरले गेले. 2021 मध्ये कोळशाने चालणाऱ्या औष्णिक विद्युत केंद्राचे उत्पादन 9 टक्क्यांनी वाढले. युरोपमध्ये खराब वातावरणामुळे स्थिती आणखीच बिघडली. अलीकडेच तेथे थंडी अधिकच जाणवली.
फ्रान्सने अणुऊर्जाच्या केंद्राची डागडुजी सुरू केली आहे. अशा स्थितीत कोळशावर अवलंबून राहणे गरजेचे होते. चीनने देखील कोळसा खाणीवर काम सुरू केले आहे. काही खाणींवर त्यांनी बंदी घातली होती. एवढेच नाही तर उत्पादन क्षमतादेखील वाढविली आहे. कोविडमुळे कोळशाचा वापर वाढला असून तो तात्पुरता आहे, असे म्हणणे चुकीचे ठरू शकते. सध्याच्या काळात कोळशाचा प्रचंड वापर होत आहे. आंतरराष्ट्रीय संस्थेने दिलेल्या इशाऱ्यानुसार, इतक्यात कोळशावरची जगाची अवलंबिता कमी होणार नाही.
2022 मध्ये जगात गेल्यावर्षीच्या तुलनेत दीड टक्के अधिक मागणी राहणार आहे. आयईएने आपल्या वार्षिक अहवालात म्हटले की, सध्याची स्थिती पाहता 2022 मध्ये कोळशाचा विक्रमी वापर होऊ शकतो. ही स्थिती 2024 पर्यंत राहू शकते. ही रशियासाठी चांगली बातमी आहे. कारण रशिया फॉसिल फ्यूएल (जीवाश्म इंधन म्हणजेच तेल आणि गॅस) चा सर्वात मोठा पुरवठादार देश आहे आणि तो आता कोळशाचे उत्पादन आणि निर्यात वाढवत आहे.
भारत आणि चीनवर कोळशाचे भवितव्य भारत आणि चीनला कोळशावरचे अवलंबित्व कमी करण्यास सांगितले आहे. युरोप आणि अमेरिकेत पुढील वर्षी प्रारंभी कोळशाचा वापर जवळपास संपुष्टात होईल. आयईएच्या मते, चीन हा जगातील एकूण कोळशापैकी निम्मे उत्पादन करतो आणि आगामी काळात त्याचे उत्पादन दरवर्षी एक टक्का याप्रमाणे वाढेल. त्याचवेळी भारताचा विचार केल्यास भारतात 2024 पर्यंत चार टक्के वाढीचा अंदाज आहे.
आयईएनुसार हे दोन्ही देश जगातील सर्वाधिक लोकसंख्येचे देश आहेत. या देशाची एकूण लोकसंख्या सुमारे तीन अब्ज आहे. त्यामुळे हेच दोन्ही देश कोळशाचे भवितव्य निश्चित करू शकतात. या देशांनी केलेल्या घोषणेनुसार कार्बन उत्सर्जन कमी करण्याचे कसे प्रयत्न होतात आणि कशा रितीने ध्येय साध्य होईल, यावर कोळशाचे भवितव्य अवलंबून आहे.