फिलाडेल्फिया – फ्लाडेल्फियातील गर्दीच्या रस्त्यावर दोघा बंदुकधाऱ्यांनी तुफान गोळीबार केला. या गोळीबारामुळे रात्रीच्यावेळी रस्त्यावर एकच धावपळ उडाली आणि किमान 6 जण जखमी झाले. त्यातील एक जण गंभीर जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. ही घटना शुक्रवारी रात्री साडे 11 वाजण्याच्या सुमारास घडली.
गोळीबारात जखमी झालेले बहुतेकजण 19 ते 29 वर्षे वयोगटातील आहेत. या सर्वांना दोन वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. बहुतेक जणांच्या जीवाला धोका नाही. पण एकाची प्रकृती गंभीर असल्याचे पोलिसांनी सांगितले. दोघा बंदुकधाऱ्यांनी बंदुकीच्या किमान 65 फैरी झाडल्या असल्याची माहिती मिळते आहे. या दोघांच्या शोधासाठी टेहळणीसाठी बसवलेले सीसीटिव्ही कॅमेऱ्यांचे चित्रीकरण तपासले जात आहे.
हा गोळीबार नक्की कोणाला लक्ष्य करण्यासाठी केला गेला होता आणि तो कोणी केला असावा, याबाबत नक्की कोणतेही धागेदोरे हाती लागलेले नाहीत. या बंदुकधाऱ्यांची सेमी ऑटोमॅटिक बंदुकांमधून गोळीबार केला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. फिलाडेल्फियामध्ये गेल्या वर्षभरात झालेल्या गोळीबाराच्या तब्बल 1,827 जण जखमी झाले आहेत. करोनाच्या साथीच्या काळानंतर या संख्येत 600 ने वाढ झाली आहे.