पुणे – विद्येच्या माहेरघर असलेल्या पुण्याच्या मध्यवर्ती भागात रहदारीच्या रस्त्यावर उभे असलेले हे प्रज्ञाशिल्प पुणेकरांना सकारात्मक संदेश देवून जाईल, असा विश्वास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी व्यक्त केला.
नगरसेविका प्रा. ज्योत्स्ना एकबोटे यांच्या विकास निधी, संकल्पनेतून आणि पुणे महापालिकेच्या पथ विभागाच्या सहकार्याने जंगली महाराज रस्ता, भोसले भुयारी मार्ग येथे प्रज्ञा शिल्पाचे उद्घाटन मोठ्या दिमाखात पार पडले. याचे अध्यक्षस्थान प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे यांनी भूषविले.
यावेळी आमदार सिद्धार्थ शिरोळे, नगरसेविका निलिमा खाडे, विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य राजेश पांडे, भाजपा युवती आघाडीच्या अध्यक्षा डॉ. निवेदिता एकबोटेसह आदी उपस्थित होत्या. पृथ्वी आणि त्यावर ग्रंथ हातात घेवून अध्ययन करणारे हे दोन विद्यार्थी विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यनगरीत शिक्षणाची ज्ञानगंगा घरोघरी जावी, असा संदेश याद्वारे प्रज्ञा शिल्पातून देण्यात आला.
अशा प्रकारची प्रज्ञा शिल्पे ही मोठ्या प्रमाणात तयार व्हायला हवीत. त्यातून पुणेकरांना सकारात्मक संदेश मिळायला हवे. शैक्षणिक हब असलेल्या ठिकाणी हे प्रज्ञाशिल्प तयार झाले आहे. हे अतिशय महत्वाचे असल्याचे डॉ. गजानन एकबोटे यांनी सांगितले. पुणे शहराच्या सौंदर्यात भर टाकण्याचे हे काम उल्लेखनीय आहे आणि अशा प्रकारची कामे सातत्याने नगरसेविका प्रा. ज्योत्स्ना एकबोटे करत असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रज्ञा शिल्प अतिशय मोक्याच्या ठिकाणी उभे राहिले आहे. ते उभे करताना वेगवेगळ्या अडचणी आल्या. त्यावर मात करून त्याची आवश्यकता पटवून देवून पूर्णत्वास नेल्याचे नगरसेविका एकबोटे यांनी सांगितले.