बीड – वडिलांच्या मदतीने पत्नीने पतीचा खून केल्याची खळबळजनक घटना माजलगाव तालुक्यात घडली आहे. अडिच महिन्यापूर्वी घडलेल्या घटनेचा पोलीसांनी 13 डिसेंबरला उलगडा केला असून तपासात पत्नीने पतीची हत्या केल्याचे उघड झाले आहे. दत्तात्रय किसन घायाळ (26, रा. तालखेड, ता. माजलगाव) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून याप्रकरणी पत्नी गीता घायाळ (19) आणि सासरे जनार्दन मस्के (50) यांच्यावर खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की, अडिच महिन्यांपूर्वी मयत दत्तात्रय यांचा मृतदेह धरणात आढळून आला होता. त्याच्या डोक्याला गंभीर इजा दिसून आल्या होत्या. ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी केल्यानंतर पोलिसांनी व्हिसेरा राखून ठेवला होता. दरम्यान पोलिसांनी त्यावेळी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. नंतर व्हिसेरा अहवालात दत्तात्रय यांचा मृत्यू डोक्याला गंभीर मार लागल्याने झाल्याचे समोर आले. तसेच मृतदेह आढळल्यापासून पत्नी गीता हिचे वर्तन संशयास्पद होते. पोलीसांनी कसून तपास केला असता पत्नी गीता आणि सासरे जनार्दन दोघांनी मिळून दत्तात्रय यांचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
जमीन नावावर करून देण्यावरून खून-
पत्नी गीताने पती दत्तात्रयकडे जमीन नावावर करून दे म्हणून तगादा लावला होता. पण त्याने नकार दिला. त्यातूनच तिने वडिलांच्या मदतीने पतीची हत्या करून मृतदेह धरणात फेकल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. दत्तात्रय याच्या भावाच्या फिर्यादीवरून पत्नी गीता आणि सासरे जानार्दन यांच्या खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.