हमीरपूर: मागील काही दिवसांत आत्महत्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. त्यातच प्रेमप्रकरणांमुळे होणाऱ्या आत्महत्यांमध्ये वाढ झाली आहे. अशीच एक घटना हमीरपूर येथे घडली आहे. येथील एका युवकाने आपल्या प्रेयसीचं दुसऱ्या मुलाशी लग्न झाल्यामुळे हताश होऊन आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. मृत तरुणाचं नाव लक्ष्मीप्रसाद प्रजापती आहे.
सविस्तर वृत्त असं की, लक्ष्मीप्रसाद प्रजापती राजस्थानावरून आपल्या गावी बसने परत येत होता. तेव्हा त्याला प्रेयसीचं लग्न झाल्याची माहिती मिळाली. प्रेयसीचं लग्न झाल्याची माहिती लक्ष्मीप्रसादच्या चांगलीचं जिव्हारी लागली. लक्ष्मीप्रसाद ललपूरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील स्वासा याठिकाणीचं बसमधून खाली उतरला. त्यानंतर एका शेतात गेला आणि तिथं त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
दरम्यान आत्महत्या करण्यापूर्वी त्याने गळफास लावलेला एक सेल्फी काढला. तो सेल्फी त्याने आपल्या नातेवाईकांना आणि मित्रांना पाठवला. त्यानंतर त्याने जीव दिला आहे. त्याने पाठवलेला फोटो मिळाल्यानंतर कुटुंबीयांनी आणि मित्रांनी त्याला सर्वत्र शोधलं. पण त्याचा काही थांगपत्ता सापडला नाही.
अखेर पोलिसांनी रात्री उशिरा, तरुणाने आत्महत्या केल्याची जागा शोधून काढली. यानंतर पोलिसांनी तरुणाचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. तरुणाच्या आत्महत्येमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.