नवी दिल्ली – सर्व ग्राहकोपयोगी वस्तू मध्ये सेमीकंडक्टरचा वापर केला जात असल्यामुळे सध्या मागणी जास्त आणि पुरवठा कमी अशी परिस्थिती सेमीकंडक्टर क्षेत्रात निर्माण झालेली आहे. ही सकारात्मक बाब आहे. वाढती मागणी लक्षात घेऊन सेमीकंडक्टर उद्योगान उत्पादन वाढविण्याचा प्रयत्न सुरू केलेला असून पुढील दोन वर्षात ही परिस्थिती सुरळीत होईल असे सांगण्यात येते.
इंटेल या सेमीकंडक्टर चिप्स पुरवणाऱ्या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पेट गेलसिंगर यांनी सांगितले की, लॉकडाऊनच्या काळामध्ये डिजिटायझेशनवर मोठ्या प्रमाणात भर दिला जात आहे. त्यामुळे विविध क्षेत्रात सेमीकंडक्टरचा वापर वाढला आहे. यामुळे विविध उत्पादनांची उपयोगिता वाढणार आहे. ही चांगली बाब आहे. मात्र अचानक वाढलेल्या मागणीमुळे पुरवठा कमी झाला आहे.
भारतामध्ये कार उद्योगालाही सेमीकंडक्टरचा तुटवडा जाणवत आहे. सेमीकंडक्टर क्षेत्रात संबंधातील सर्वच कंपन्यांनी उत्पादन वाढविण्यासंदर्भात प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र अचानक निर्माण झालेल्या मागणीमुळे हे काम पूर्ण होण्यास आणखी दोन वर्षाचा कालावधी लागेल. अगोदर फक्त कॉम्प्युटर मध्ये सेमीकंडक्टरचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येत होता. आता विविध ग्राहकोपयोगी वस्तू, दूरसंचार क्षेत्र, वाहतूक व्यवस्था इत्यादी क्षेत्रातही सेमीकंडक्टर चा वापर वेगाने वाढू लागला आहे.
सध्या अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणात सेमीकंडक्टरची निर्मिती केली जात होती. आता आम्ही इतर देशातही सेमीकंडक्टरची निर्मिती करण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. उत्पादन वाढविण्याबरोबरच या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात संशोधन आणि विकासाची गरज असते.
त्या दृष्टिकोनातूनही आमचे प्रयत्न चालू आहेत. मोबाईल कंपन्या 5-जी तंत्रज्ञानाच्या आधारावर सेवा सुरू करणार आहेत. त्या क्षेत्राला मोठ्या प्रमाणात सेमीकंडक्टरची गरज असणार आहे. ती गरज पूर्ण करण्यासाठी हे प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.