जालना – जिल्यातील जामवाडी शिवारातल्या विहिरीत कार कोसळून आईसह चिमुकलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. आरती फांदडे आणि माही फांदडे अशी अपघातात मृत्यू पावलेल्यांची नावे आहेत. या विहिरीत कार कोसळण्याची ही दुसरी घटना आहे. दोन दिवसांपूर्वीच येथे कार कोसळून दोघांचा मृत्यू झाला होता.
जालना-देऊळगाव राजा मार्गालगत जामवाडी श्रीकृष्णनगर परिसरात एक विहीर आहे. मार्गालगत असलेल्या या विहिरीचा वाहन चालकांना अंदाज येत नाही. मागील दोन दिवसांतच या विहिरीत दोन कार पडल्या आहेत. शुक्रवारी (ता.13) रात्री या विहिरीत कार कोसळून बीड येथील दोघांचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच आज रविवारी (ता. 14) पहाटे पुन्हा या विहिरीत कार कोसळून मायलेकींचा मृत्यू झालाय. कारमधील इतर तीन जण जखमी असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघातग्रस्त आय20 कार क्रेनच्या साह्याने बाहेर काढण्यात आली. गाडीतील तिघांना जिवंत बाहेर काढण्यात यश आले मात्र, आई आणि चिमुकलीचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतदेह जिल्हा सामान्य रूग्णालयात पाठविण्यात आले आहेत.