पुणे – सातबारा उताऱ्यावरील प्रलंबित नोंदी निकाली काढण्यासाठी फेरफार अदालतींचे आयोजन करण्यात येत आहे. जिल्ह्यात मंडलस्तरावर झालेल्या फेरफार अदालतीमध्ये 4 हजार 243 प्रकरणे निकाली काढली आहेत.
जिल्ह्यातील मंडळस्तरावर दर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी फेरफार अदालती घेतल्या जात आहेत. प्रलंबित साध्या, वारस, तक्रारी नोंदी निर्गमित करण्याच्या शासनाच्या सूचना आहेत. ग्रामपंचायत निवडणुकांमुळे या महिन्यातील फेरफार अदालत तिसऱ्या बुधवारी म्हणजेच दि. 20 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आली होती.
जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच प्रलंबित नोंदीबाबत विशेष मोहिम घेऊन मागील तीन महिन्यांत 61 हजार नोंदी निर्गमित केल्या आहेत. जिल्ह्यात सध्या 27 हजार नोंदी प्रलंबित असून, त्यापैकी 16 हजार नोंदी नोटीस काढणे व बजावण्यावर प्रलंबित आहेत. 11 हजार नोंदी प्रमाणीकरणासाठी उपलब्ध असून, यापैकी 4 हजार 243 नोंदी निर्गमित करण्यात आल्या आहेत.