अग्निशमन दलाला अपुऱ्या मनुष्यबळाची “झळ’

सेवा नियमावली 3 वर्षांपासून मंजुरीसाठी प्रलंबित

 

पुणे – तब्बल 45 लाख लोकसंख्या असलेल्या तसेच 23 गावांचा महापालिकेत समावेश झाल्यानंतर राज्यातील सर्वात मोठे शहर होणाऱ्या पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलाचा कारभार केवळ 400 कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर सुरू आहे. या विभागासाठी 910 पदे मंजूर असून ही पदभरतीची नियमावली गेल्या 3 वर्षांपासून राज्य शासनाकडे मान्यतेसाठी पडून आहे. त्यामुळे भंडारा दुर्घटनेच्या पार्श्‍वभूमीवर तातडीने ही पदे भरण्यात यावीत, अशी मागणी सजग नागरिक मंचाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

भंडारा अग्निकांडानंतर अग्निसुरक्षा हा विषय ऐरणीवर आला आहे. अशा प्रकारच्या घटना घडू नयेत व घडल्या तरी कमीतकमी हानी व्हावी यासाठी महापालिका/नगरपालिका/नगरपंचायतीच्या अग्निशमन दलात सुयोग्य व पुरेसे कर्मचारी असणे आवश्‍यक आहे. अग्निशमन दलातील अधिकारी व कर्मचारी यांची भरती करण्यासाठी आदर्श सामायिक सेवा प्रवेश नियमावली राज्यातील अग्निशमन सेवा संचालनालयाने मार्च 2018 मध्ये तयार करून नगरविकास मंत्रालयाकडे मंजुरीसाठी सादर केली होती. याला तीन वर्षे होत आली तरी अजून मंजुरी प्रलंबित आहे.

याचा परिणाम म्हणजे पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलातील भरती रखडली आहे. आजमितीला अग्निशमन दलातील मंजूर 910 पदांपैकी 510 पदे रिक्‍त आहेत. पुणे शहराचा विस्तार आणि सुरक्षितता विचारात घेता या सेवेतील पदे दीर्घकाळ रिक्‍त ठेवणे अडचणीचे असल्याचे पुणे महापालिकेच्या आयुक्‍तांनी सातत्याने नगरविकास मंत्रालयाच्या प्रधान सचिवांना कळवूनही मंत्रालयाकडून निर्णय घेतला जात नाही.

नगरविकास मंत्रालय थेट आपल्या अखत्यारीत येत असल्याने आपण तातडीने विभागाच्या प्रधान सचिवांना ही नियमावली मंजूर करण्याचे आदेश द्यावेत तसेच तीन वर्षे विनाकारण ही मंजुरी प्रलंबित ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही मंचाने केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.