आळंदी – श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाच्या डुडुळगाव येथिल शिक्षणमहर्षी विलासराव तांबे शैक्षणिक संकुलात 77 वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. राष्ट्रध्वज पूजन माजी वायुसेना अधिकारी मधुकर सोळंकी यांच्या हस्ते झाले तर ध्वजारोहण तुरुंग अधिकारी प्रशिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य चंद्रमणी इंदुरकर यांच्या हस्ते झाले. यावेळी राजा शिवछत्रपती विद्यालय आणि आदित्य इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत आणि आपली मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी चंद्रमणी इंदुरकर स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा देतांना म्हणाले, स्वातंत्र्य म्हणजे आत्मसन्मान, स्वाभिमान, निर्भरता असून भारतीयांनी देशाच्या स्वातंत्र्याचा इतिहास जपला पाहिजे. कारण जो इतिहासाकडे डोळे झाक करतो तो कधीच इतिहास घडवू शकत नाही. देशातील प्रत्येक नागरिकाने प्रथम देशाचा व नंतर स्वतःचा विचार करणे मूलभूत कर्तव्य असून आपल्या शिक्षणाचा वापर देशहितासाठी करणे आवश्यक आहे. मोबाईल संस्कृती तरुणाईला कशी घातक आहे यासंदर्भात विविध उदाहरणे देत स्पर्धेच्या युगात तरुण वर्गाने स्पर्धा परीक्षेचा मार्ग स्वीकारण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. मधुकर सोळंकी म्हणाले की, देशातील तरुण वर्ग जोपर्यंत घर सोडत नाही तोपर्यंत त्याला दुसऱ्यांचे घर कळत नाही. तसेच भारताची वायुसेना कशी जगापेक्षा वेगळी व महाराष्ट्रीयन संस्कृती कशी स्वाभिमानाची व अभिमानाची आहे या संदर्भात त्यांनी विवेचन केले.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विशाल तांबे, सचिव वैभव तांबे व खजिनदार मयूर ढमाले, व्यवस्थापकीय सल्लागार राजीव पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सर्जेराव बरकडे यांनी केले तर अतुल पानसरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
याप्रसंगी लक्षवेध करियर अकॅडमीचे संस्थापक संजय कांबळे, टायकोंडो राष्ट्रीय क्रीडा मार्गदर्शक अभंग सर, बांधकाम व्यवसायिक ज्ञानेश्वर वरुटे, डुडुळगावचे माजी सरपंच विठ्ठल तळेकर, शरदचंद्र पवार कला आणि वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हंसराज थोरात प्राचार्य, ज्ञानविलास कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. प्रमोद इंगळे, आदित्य इंटरनॅशनल स्कूल मुख्याध्यापिका शितल पाटील, राजा शिवछत्रपती विद्यालयाचे मुख्याध्यापक अतुल पानसरे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच शैक्षणिक संकुलातील शरदचंद्र पवार कला आणि वाणिज्य महाविद्यालय, ज्ञानविलास कॉलेज ऑफ फार्मसी, रामचंद्र पाटील औटी ज्युनियर कॉलेज, राजा शिवछत्रपती विद्यालय व आदित्य इंटरनॅशनल स्कूल मधील सर्व विभाग प्रमुख, सहाय्यक प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते, अशी माहिती महाविद्यालयाचे प्रसिद्धी विभाग प्रमुख प्रा. माणिक कसाब यांनी दिली.