पुण्यात हिऱ्यांचा पाऊस!
पुणे, ता. 25 – पुण्यात हिऱ्यांचा पाऊस! दुपारी चार वाजता पाऊस पडत होता आणि अप्सरा टॉकीज, स्वारगेट, वगैरे भागात लोक “हिरे’ वेचत होते. शेकडो लोक धावले आणि आपले नशीब उघडले म्हणून त्या हिऱ्यांवर तुटून पडत होते. कुणाला पाचू सापडला, कुणाला इंद्रनील मिळाला! ही “हिऱ्याची वृष्टी’ची वार्ता शहरात पसरली आणि निरनिराळ्या भागातील लोक तिकडे धावले. कोणी म्हणाले, “पाऊस कुठला पडतो? विमानातून ते पडले असतील.’
कोणी सांगता झाला “देवाची लीला काय सांगा?’ “खुदा देता है तो छप्पर फाड के देता हैं.’ लोकांनी अधाश्याप्रमाणे हे हिरे गोळा केले. कोणी न बोलता लपवून ठेवले. पोलिसांना याची खबर लागली. त्यांचे म्हणणे महर्षिनगर विभागातील गिरजा ग्लास कारखान्याकडे जाणाऱ्या ट्रकमधील काचेच्या तुकड्यांचे पोते फुटले. त्यातले हे तुकडे आहे. काचेचे खडे चांगले घडविलेले आहेत. अर्थात तरीही लोकांचा विश्वास बसत नाही. वेचलेला हा “माल’ ती जपून ठेवीत आहेत!
पुण्यात सप्टेंबरात दुरचित्रवाणी
पुणे – पुणे व पुणे परिसरातील 110 मैलाचे परिसरात दुरचित्रवाणीचा कार्यक्रम सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होईल असे दिग्दर्शक गजानन जहांगिरदार यांनी सांगितले. ते पुण्यात दुरचित्रवाणी सुरू होत असल्याने महापौर शांताराम दिवेकर यांची मुलाखत घेण्यासाठी आले.
होते. पुणे व परिसरात दुरचित्रवाणी सुरू होत असल्याने त्यासंबंधी आपण या बाबतचा लघुपट तयार करीत आहोत व त्यात सिंहगडचा रोमांचकारी इतिहास आहे व पुणे महापौरांची मुलाखत व सामान्य ग्राहक आणि काही वास्तववादी प्रसंग असतील.
कुटुंब नियोजन प्रचारकांना यापुढे पैसे न देण्याचा निर्णय
मुंबई – कुटुंब नियोजन प्रमोटर्सना यापुढे इन्सेन्टिव्ह म्हणून देण्यात येणाऱ्या रोख रकमा यापुढे बंद करण्यात येणार आहेत, असे केंद्रीय आरोग्यमंत्री र. घ. खाडिलकर यांनी जाहीर केले. या रोख रकमा दिल्याने गैरप्रकार वाढले. ही रक्कम गावोगावी जाऊन प्रचार करणाऱ्या प्रचारकांना प्रवासभत्ता म्हणून दिली जाईल.