पाकच्या संपूर्ण विघटनेची भुट्टोंची योजना?
नवी दिल्ली, 4 – पाकचे माजी पंतप्रधान भुट्टो यांनी 1978च्या डिसेंबरपर्यंत पाकचे संपूर्ण विघटन करण्याची योजना तयार केली होती, असे भुट्टोंचे एक माजी सहकारी अन्वर अलेम्मी यांनी येथे जाहीर केले. 1976 मध्ये ही योजना भुट्टो यांनी अलेम्मी यांना सांगितली होती.
भुट्टो त्यावेळी म्हणाले होते, “सिंध व पश्चिम पंजाब भारतात समाविष्ट होणार, बलुचिस्थान इराणला मिळणार, वायव्य प्रांत अफगाणिस्तानात जाणार आणि कराची आंतरराष्ट्रीय बंदर म्हणून राहील.’ या योजनेची आता चौकशी होणार आहे.
भारत व अमेरिका मानवी हक्क रक्षण करतील
मुंबई – अमेरिकेतील भारताचे नियोजित वकील पालखीवाला यांचा भारतीय विद्याभवनातर्फे सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते म्हणाले, भारत व अमेरिका यांच्यावर मानवी हक्क रक्षणाची मोठीच जबाबदारी आहे. दोन्ही सरकारांमध्ये स्नेहसंबंध आहेत.
उभय देशात नवी लोकशाहीवादी सरकारे स्थापन झालेली आहेत व ती ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडतील, असा मला विश्वास वाटतो. मानवी हक्कांबाबत जगात जागृती होणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.