मॅंगनीज खाणी आता भारताच्या मालकीच्या
नवी दिल्ली, दि. 30 – मॅंगनीज ओझर लि. या ब्रिटिश कंपनीचे 49 टक्के शेअर भारत सरकारने घेतल्यामुळे ही कंपनी आता संपूर्णपणे भारत सरकारच्या मालकीची झाली आहे. त्यामुळे गेली 60 वर्षे ब्रिटिश सरकार भारतातील खाण संपत्तीत मालकी हक्काने व्यवहार करीत असे तो आता संपुष्टात आला आहे.
तेल व नैसर्गिक वायू महामंडळाची पुनर्रचना?
डेहराडून – तेल व नैसर्गिक वायू महामंडळाची पुनर्रचना करण्याचा सरकार क्रियाशील विचार करीत आहे, असे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री म्हणाले.
शीख गुरूंची शिकवण अमलात आणा
अमृतसर – शीख गुरूंनी दिलेली शिकवण अमलात आणून त्यांनी दाखविलेल्या मार्गावर निष्ठावान राहा, असे आवाहन पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी शीख समाजास केले. अमृतसर शहराच्या 400व्या वर्धापनदिनानिमित्ताने देसाई बोलत होते.
न भिता बोटीच्या जॅकस्टेवरून देसाई गेले
मुंबई – बोटीच्या जॅकस्टेवरून 83 वर्षांचे मोरारजी देसाई एका बोटीवरून दुसऱ्या बोटीवर गेले हे एक आश्चर्यच घडले. हा प्रवास त्यांना मोठ्या मजेचा वाटला. त्यांना जॅकस्टेवरून जाताना भीती वाटली नाही.