हर्षद कटारिया
पुणे/बिबवेवाडी- पुणे-सातारा रस्त्यावरील रॉयल ऑर्किड सोसायटीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकाने सोसायटीतील तिसऱ्या मजल्यावरील सदनिकेत सुरू होणाऱ्या उपहारगृहात येण्या-जाण्यासाठी इमारती बाहेरून थेट लोखंडी जिना तयार केला आहे. याकामी परवानगी दिली नसल्याचे सोसायटीचे म्हणणे आहे तर सदर कामाशी आपला काहीही संबंध नसल्याचे संबंधित नगरसेवकाचे म्हणणे आहे. परंतु, या लोखंडी जिन्याची खरपूस चर्चा पर्वती मतदार संघातील राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे.
पुणे-सातारा रस्त्यावरील शंकर महाराज मंदिराजवळील रॉयल ऑर्किड सोसायटीतील तिसऱ्या मजल्यावर सदनिकाचे रूपांतर उपहारगृहात (रेस्टॉरंट) करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या नियोजित उपहारगृहामुळे सोसायटीतील सभासदांना त्रास होणार असल्याचे सोसायटीतील रहिवासीयांनी तक्रार अर्जात म्हटले आहे. नियोजित उपहारगृहात ये-जा करण्यासाठी मुख्य रस्त्यापासून एक अवाढव्य लोखंडी जिना बांधण्याचे काम करण्यात आले आहे. याकामास सोसायटी सभासदांनी मंजुरी दिलेली नाही. सोसायटीत ये-जा करण्यासाठी असा वेगळा पूल (रॅम्प) बांधता येतो का? असा सवाल सोसायटीतील रहिवासीयांनी पुणे महानगरपालिकाकडे उपस्थित केला आहे. सोसायटीतील रहिवासीयांनी पालिका आयुक्त तसेच अतिक्रमण बांधकाम निर्मूलन विभागाकडेही याबाबत तक्रार अर्ज दिला आहे.
यापार्श्वभूमीवर संबंधित विभागातील अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली असता माहिती घेतो…फ, इतकेच सांगण्यात आले. सोसायट्यातील सदनिकेत जाण्यासाठी अशा प्रकारे वेगळा लोखंडी जिना तयार करण्यास कोणत्या प्रशासनाने परवानगी देण्यास सुरुवात केली आहे? असे झाले तर शहरातील सोसायट्यांमध्ये काय चित्र असेल, याबाबत परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे.
रॉयल ऑर्किड मधील संबंधित सदनिका माझ्या नावावर असताना संबंधित परवानग्या घेतल्या असून आता सदर सदनिका माझ्या नावावरच नाहीत. त्यामूळे माझा सदर प्रकरणाशी काहीही संबंध नाही.
– राजेंद्र शिळीमकर, नगरसेवक
संबंधित इमारतीला दिलेली बांधकाम परवानगी व नकाशे पाहून पुढील माहिती घेण्यात येईल. त्यानुसार पुढील कार्यवाही करू.
– राजेंद्र राऊत, अभियंता, बांधकाम विकास विभाग, पुणे महानगरपालिका
रॉयल ऑर्किड सोसायटीमध्ये लोखंडी जिना (रॅम्प) टाकून ज्या पद्धतीने बांधकाम केले जात आहे त्याकडे महानगरपालिकेचाबांधकाम विभाग का दुर्लक्ष करीत आहे? पालिका आयुक्तांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. सर्वसामान्य नागरिक व्यवसाय करण्यास अनधिकृतपणे पदपथावर थांबला तरी पालिकेचा विभाग कारवाई करतो तर मग अशा चुकीच्या धोकादायक कामाला अभय का दिला जात आहे. लोकशाहीमध्ये सर्वांना एकसमान कायदा असणे गरजेचे आहे, अशा कामांवर कारवाई झाली नाही तर शहरभरातील सोसायट्यांमध्ये अनेक जण अशा प्रकारे अनधिकृतपणे लोखंडी जिना करून सदनिकेत जाण्यास वेगळा रस्ता करतील.
– संतोष नांगरे,
राष्ट्रवादीपक्ष अध्यक्ष (ओबीसी सेल, पुणे शहर)