पुणे – निवृत्त लष्करी अधिकाऱ्याच्या मुलीला कार चालविण्याचे प्रशिक्षण देण्याच्या बहाण्याने अपहरण करत लुटल्याप्रकरणी दोघांना गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने दिल्लीतून बेड्या ठोकल्या. यात राजेशसिंग माही (वय 39, रा. मेरठ-उत्तरप्रदेश), कृष्णा राणा ( वय 30, रा. महिपालपूर-दिल्ली) यांना अटक करण्यात आली आहे, पोलिसांचे पथक आरोपींना घेऊन पुण्याकडे रवाना झाल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त बच्चन सिंग यांनी दिली.
महिलेला लुटल्यानंतर आरोपींनी पुण्यातून ओला कॅबने मुंबई गाठली. याचा तपास करत असताना, युनिट-5 च्या पथकाला तांत्रिक माहितीद्वारे आरोपी दिल्लीला पळाल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी दिल्ली गाठत दोघांना ताब्यात घेतले. राजेश सिंग हा स्टडफार्म येथे काम करण्याबरोबरच गाडी चालवण्याचे काम करतो.
तर, कृष्णा हा चिकन विक्री करतो. आरोपींनी मंगळवारी (दि.10) सकाळी पिसोळी ते नताशा हिल व्ह्युव एनआयबीएम-कोंढवा परिसरात अभियंता महिलेला दोघांनी लुटले होते. तिचे सोन्याचे दागिने कटरने कापून घेण्यात आले.
तसेच गुगल पे व एटीएम कार्डमधून जबरदस्तीने पैसे काढून घेतले. महिलेला कारमध्ये बांधलेल्या अवस्थेतच सोडून आरोपींनी पळ काढला होता. ही कामगिरी उपायुक्त बच्चन सिंग याच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने केली.