Dadar Kabutar Khana : जैन समाजाचा नवा डाव, छतावर सुरू केला अनधिकृत कबुतरखाना

Dadar Kabutar Khana : मुंबईच्या दादर येथील कबुतरखाना बंद करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश आणि महानगरपालिकेची कारवाई यांना धाब्यावर बसवत जैन समाजाने आता नव्या जागेवर कबुतरांना खाणे घालण्याचा मार्ग शोधला आहे. दादरच्या कबुतरखान्याला ताडपत्री टाकून बंद केल्यानंतर स्थानिक जैनधर्मीयांनी जवळच्या जैन मंदिराशेजारील एका इमारतीच्या छतावर अनधिकृतपणे नवा कबुतरखाना सुरू केला आहे.
यापूर्वी फुटपाथवर किलोच्या किलो धान्य टाकणे किंवा कारच्या छतावर धान्याचे ट्रे ठेवणे अशा युक्त्या स्थानिकांनी वापरल्या होत्या. मात्र, पोलिसांनी यावर कडक कारवाई केल्यानंतर आता छतावर धान्याची पोती रिकामी करून कबुतरांना आकर्षित केले जात आहे. परिणामी, हजारोंच्या संख्येने कबुतरे या इमारतीच्या छतावर जमू लागली आहेत. यामुळे आजूबाजूच्या रहिवाशांना कबुतरांच्या विष्ठेमुळे आणि पिसांमुळे आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने कबुतरांना खाणे टाकण्यास स्पष्ट मनाई केली असतानाही स्थानिकांनी ही बेकायदेशीर कृती सुरू ठेवली आहे. यामुळे प्रशासन आणि न्यायव्यवस्थेला थेट आव्हान दिले जात असल्याची भावना परिसरातील नागरिकांमध्ये आहे. कबुतरखाना बंद करण्यामागे आरोग्याच्या समस्यांचा मुख्य मुद्दा होता, परंतु नव्या अनधिकृत कबुतरखान्यामुळे हा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. स्थानिक रहिवाशांनी याविरोधात तातडीने कारवाईची मागणी केली आहे.
दरम्यान, या वादाने सामाजिक तणावही निर्माण केला आहे. मराठी एकीकरण समितीने कबुतरखाना बंद करण्याच्या मागणीसाठी बुधवारी (13 ऑगस्ट 2025) दादर परिसरात आंदोलन करण्याची घोषणा केली होती.
मात्र, मंगळवारी रात्री पोलिसांनी समितीच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावून आंदोलनास परवानगी नाकारली. 6 ऑगस्ट रोजी जैन आणि मारवाडी समाजाच्या आंदोलनादरम्यान पोलिसांवर धक्काबुक्की आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाल्याचा आरोप आहे. यावेळी हजारो लोक रस्त्यावर उतरले होते, ज्यामुळे सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागला.





