पुणे – पुणे पीपल्स को-ऑपरेटिव्ह बॅंक लिमिटेड, पुणे या मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह बॅंकेची 70 वी वार्षिक सर्वसाधारण सभा 30 सप्टेंबर रोजी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
या मल्टीस्टेट बॅंकेच्या 22 शाखा व एक विस्तारित कक्ष आहे. बॅंकेने 31 मार्च 2021 अखेर एकूण व्यवसाय 2,019 कोटी रुपयाचा केला आहे. बॅंकेस 15 कोटी 22 लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. बॅंकेचे निव्वळ एनपीए 0.77% व सीआरएआर 14.11 टक्के एवढा आहे.
एटीएम सुविधा, सर्व शाखा संगणकीकृत, ग्राहकासाठी फंड ट्रान्सफरच्या आधुनिक सोयीसुविधा अंतर्गत प्रशिक्षणासाठी स्वतःचे सुसज्ज प्रशिक्षण केंद्र या वैशिष्टयांसह बॅंक कार्यरत आहे. रिझर्व बॅंकेच्या मान्यतेअधिन राहून अहवाल वर्षासाठी सभासदांना 12 टक्के दराने लाभांश देण्याचा संचालक मंडळाच्या शिफारशीला सर्वसाधारण सभेने एकमताने मंजुरी दिली असल्याची माहिती बॅंकेचे अध्यक्ष सीए जनार्दन रणदिवे यांनी दिली.
यावेळी महाराष्ट्र सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल विद्याधर उर्फ बाळासाहेब अनास्कर यांचा सत्कार करण्यात आला. अनास्कर म्हणाले की, मी सहकार क्षेत्रात 32 वर्ष कार्य केले आहे. प्राप्त परिस्थिती स्वीकारून प्रामाणिक व निष्ठापूर्वक प्रयत्न केल्यास यश नक्की मिळते. कोवीडच्या प्रतिकूल परिस्थितीतही पुणे पीपल्स बॅंकेने केलेली प्रगती उल्लेखनीय आहे.
यावेळी बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सदानंद दीक्षित, ज्येष्ठ संचालक ऍड सुभाष मोहिते, सहाय्यक सरव्यवस्थापक उमेश समुद्र उपस्थित होते. पुणे पीपल्स को-ऑपरेटिव्ह बॅंकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत विद्याधर अनास्कर यांची महाराष्ट्र सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार करताना बॅंकेचे अध्यक्ष सीए जनार्धन रणदिवे, संचालक ऍड. सुभाष मोहिते, बिपिन कुमार शहा, विजयकांत कोठारी, श्रीधर गायकवाड, सुभाष नडे व दिलीप दगडे.