बीजिंग: चीनमध्ये तीन महिन्यांपेक्षा अधिक कालावधीनंतर प्रथमच एका दिवसात 101 नवे करोनाबाधित आढळले. त्यामुळे त्या देशात करोना फैलावाची दुसरी लाट येण्याची भीती खरी ठरण्याची चिन्हे बळावली आहेत.
सर्वप्रथम चीनमध्ये मागील वर्षाच्या अखेरीस म्हणजे डिसेंबरमध्ये करोनाचा उद्रेक आढळला. त्यानंतर त्या विषाणूचा फैलाव जगभरात झाला. सध्या अनेक देशांना करोना संकटाशी झुंजावे लागत आहे.
मात्र, चीनने करोना फैलावावर लक्षणीय नियंत्रण मिळवल्याचे चित्र मागील काही महिन्यांपासून आहे. अर्थात, त्या देशात करोना फैलावाची दुसरी लाट येण्याची भीती सातत्याने व्यक्त केली जात आहे. अशातच त्या देशात एकाच दिवशी 100 हून अधिक नव्या बाधितांची नोंद झाली. ती घडामोड चीनची धास्ती वाढवणारी आहे.
बहुतांश नवे बाधित झिनजियांग भागात आढळले आहेत. चीनमध्ये आतापर्यंत 84 हजार 60 बाधित आढळले आहेत. त्यातील जवळपास 79 हजार बाधित करोनामुक्त झाले आहेत. तर चीनमधील करोनाबळींची संख्या 4 हजार 634 इतकी आहे. त्या देशात सध्या केवळ 482 बाधितांवर उपचार चालू आहेत.