खासगी रुग्णालये फुल्ल : थंडी, ताप, अंगदुखीचे सर्वाधिक रुग्ण
सोमेश्वरनगर- सोमेश्वर परिसरात साथीच्या आजारांनी थैमान घातले असल्याने खासगी रुग्णालये “फुल्ल’ झाली आहेत. वातावरणातील सततच्या बदलाने नागरीक व लहान मुले आजारी पडण्याचे प्रमाण वाढले असून ताप थंडीने नागरिक हैराण झाले आहेत.
सोमेश्वरनगर परिसरातील सर्वच खासगी रुग्णालयात सध्या थंडी, ताप, अंगदुखी, खोकला, सर्दीची सर्वाधिक रुग्ण दाखल होत आहेत. गॅस्ट्रो, अतिसार, डेंग्यू ताप, मलेरीया, चिकुनगुनिया आदी आजार होण्याची शक्यता असून नागरिकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याची गरज यानिमित्ताने व्यक्त होत आहे.
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज खोमणे म्हणाले की, आरोग्य विभागाच्या वतीने यावर आळा घालण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. पावसाचे पाणी साचून राहिल्यानंतर त्याद्वारे संसर्गजन्य आजार पसरत आहेत. ग्रामीण भागातही डांसाचे प्रमाण वाढले असून त्याद्वारे आजार वाढत आहेत. सोमेश्वरनगर परिसरातील वाणेवाडी, मुरूम, वाघळवाडी, निंबुत, करंजेपूल, करंजे, सोरटेवाडी, होळ आदी भागासह वाड्यावस्त्यांवरील नागरिक साथीच्या आजाराने त्रस्त आहेत.
होळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने परिसरातील ग्रामपंचायतींना धुराळणी करण्याबाबत सूचना देण्यात आल्या असून डबकी, टायर हटविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व आरोग्य केंद्राच्या प्रमुखांची व कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन आजाराबाबत दक्ष राहण्याच्या सूचना करण्यात आली आहे. स्वाईन फ्ल्यूबाबत टॅम्यु फ्ल्यूच्या गोळ्या सर्वच आरोग्य केंद्रात उपलब्ध करून देण्यात आल्या असून नागरिकांनी पाणी गाळून, उकळून पिण्याचे आवाह त्यांनी केले आहे.