Devendra Fadnavis: ‘महाराष्ट्राच्या राजकारणातील भीष्म पितामह!’ देवेंद्र फडणवीसांकडून अण्णासाहेब डांगे यांचा गौरव
Devendra Fadnavis: आष्टा येथे डॉ. अण्णासाहेब डांगे यांच्या 'आम्रवृक्ष' आत्मचरित्राचे प्रकाशन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भव्य सोहळा संपन्न.

Devendra Fadnavis – डॉ. अण्णासाहेब डांगे यांनी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व औद्योगिक क्षेत्रात केलेले काम मार्गदर्शक आहे. राज्याच्या राजकीय, सामाजिक जीवनातील ते भीष्म पितामह आहेत. राज्यात 1980 च्या दशकात भाजपने शेतकरी कर्जमाफीचा लढा आप्पांच्या नेतृत्वामध्ये हाती घेतला. मोर्चे, आंदोलने करून कर्जमाफीचा मुद्दा ऐरणीवर आणला.
म्हणूनच डांगे आप्पांना 91 व्या वाढदिवसानिमित्त राज्यातील 56 लाख शेतकर्यांना कर्जमुक्त करून अनोखी भेट दिली, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. आष्टा येथे डॉ. अण्णासाहेब डांगे शैक्षणिक संकुलात माजी मंत्री डॉ. अण्णासाहेब डांगे यांचा सत्कार व ‘आम्रवृक्ष’ या आत्मचरित्राचे प्रकाशन तसेच सुभद्रा इंटरनॅशनल स्कूल, अण्णासाहेब डांगे फार्मसी कॉलेज व अण्णासाहेब डांगे औद्योगिक प्रशिक्षण केंद्र इमारतींचा उद्घाटन सोहळा रविवारी पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील अध्यक्षस्थानी होते. यावेळी डॉ. अण्णासाहेब डांगे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, खासदार धैर्यशील माने, खासदार धनंजय महाडिक, आमदार सुरेश खाडे, आमदार विनय कोरे,
आमदार सदाभाऊ खोत, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सत्यजित देशमुख, आमदार सुहास बाबर, आमदार धैर्यशील कदम, आमदार अरुण लाड, संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अॅड. चिमण डांगे, सहसचिव विश्वनाथ डांगे यांची प्रमुख उपस्थिती होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, डांगे आप्पांचे माझ्या वडिलांपासून ऋणानुबंध आहेत.

आष्टा: माजीमंत्री डॉ. अण्णासाहेब डांगे यांच्या ‘आम्रवृक्ष’ या आत्मचरित्राचे प्रकाशन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
राज्यात भाजपचे ते ज्येष्ठ नेते आहेत. राज्यामध्ये युतीचे सरकार असताना डांगे आप्पांकडे पाणीपुरवठा मंत्रीपदाची धुरा होती. त्यांनी राज्य टँकरमुक्त करण्यासाठी लागणार्या निधीचे शिवधनुष्य उचलले. राज्याला टँकरच्या जाळ्यातून मुक्त करण्याचे श्रेय त्यांनाच जाते. डांगे आप्पांचे शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य आहे. त्यांनी स्थापन केलेल्या आश्रमशाळा राज्यात सर्वोत्तम आहेत. राज्यात बहुतांशी सूतगिरणी अडचणीत असताना दीनदयाळ सूतगिरणी चांगल्या पद्धतीने सुरू आहे.
मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, राजकारण हे समाजकारणाचे प्रभावी माध्यम आहे हे जाणून डांगे आप्पांनी संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्था स्थापन केली. संस्थेच्या शाळा, कॉलेज व आश्रमशाळेतून हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. डांगे आप्पा नारळासारखे वरून कठीण व आतून मृदू पाण्यासारखे आहेत. म्हणूनच समाजासाठी जगणारे ते सर्वांचे पालक आहेत.
डॉ. अण्णासाहेब डांगे म्हणाले, राजकीय व सामाजिक वाटचालीत अनेक लोकांचा संपर्क आला. परंतु आज जीवनातील सर्वात उत्तुंग दिवस आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या कुटुंबासमवेत जुने ऋणानुबंध आहेत. विधिमंडळात विरोधी पक्ष नेता असताना धकाधकीच्या राजकारणातही सर्वांशी राजकीय संबंध जोपासले. राजकारणात आमदार, मंत्री, विरोधी पक्षनेता म्हणून काम पाहिले.
एका वेळी 8 खात्याचा मंत्री म्हणून कार्यभार सांभाळला. ग्रामविकास व पाणीपुरवठामंत्री असताना त्याकाळी राज्य टँकरमुक्त केल्याचा अभिमान वाटतो. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, डॉ. राम शिंदे, अॅड. चिमण डांगे यांचे भाषण झाले. भाजपचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक मकरंद देशपांडे,
जनसुराज्यचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, शेखर इनामदार, भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, प्रकाश ढंग, शिवसेना जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, जिल्हा बँकचे संचालक राहुल महाडिक, गौरव नायकवडी उपस्थित होते. अॅड. चिमण डांगे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. विश्वनाथ डांगे यांनी आभार मानले.
डांगे आप्पांच्या स्वप्नातील काम पूर्ण करणार
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्यानंतर हिंदवी स्वराज्याचा देशात विस्तार करण्याचे काम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केले. परंतू त्यांच्या जन्मस्थळाचा विसर सर्वांना पडला.डांगे आप्पांनी अहिल्यादेवींचे जन्मस्थळ शोधून चौंडी गावच्या विकासास सुरुवात केली. राज्य सरकारने चौंडीच्या विकासासाठी 700 कोटीचा आराखडा मंजूर केला आहे. आप्पांच्या स्वप्नातील काम पूर्ण करणार आहोत, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.





