Woman Enumerator Attack : पुण्यात खळबळ! महिला प्रगणकावर हल्ला; महापालिका कर्मचारी संघटना आक्रमक
Woman Enumerator Attack : फिल्डवर काम करणाऱ्या महिला कर्मचारी असुरक्षिततेच्या छायेत; सुरक्षेसाठी पोलीस संरक्षण देण्याची युनियनची मुख्य मागणी.

Woman Enumerator Attack – मुकुंदनगर येथील मीनाताई ठाकरे वसाहतीत जनगणनेचे काम करणाऱ्या महापालिकेच्या महिला प्रगणकावर आणि तिच्या मुलावर झालेल्या हल्ल्यामुळे महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. शासकीय काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांवरच हल्ले होत असतील, तर शहरात कायदा आणि सुव्यवस्था उरली आहे का, असा सवाल करत पुणे महापालिका कामगार युनियनने महापालिका प्रशासन आणि पोलिसांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
दोषींवर तातडीने कठोर कारवाई न झाल्यास संपूर्ण जनगणना कामावर संघटनात्मक बहिष्कार टाकण्यात येईल, असा आक्रमक इशारा युनियनने आयुक्त आणि महापौरांना पत्राद्वारे दिला आहे. बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयांतर्गत मुकुंदनगर येथील मीनाताई ठाकरे वसाहतीत जनगणनेचे शासकीय काम करत असलेल्या महिला सेविकेला शिवीगाळ करून अपमानित करण्यात आले,
तसेच या प्रकाराचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या तिच्या मुलाला स्थानिक नागरिकांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप युनियनने केला आहे. फिल्डवर काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांची सुरक्षा प्रशासनाला देता येत नसेल, तर त्यांनी नागरिकांची सेवा कशी करायची? असा सवाल करत युनियनने प्रशासनाच्या भूमिकेवरही गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. शहरात शासकीय कर्मचाऱ्यांवर वाढत्या हल्ल्यांमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, कर्मचारी असुरक्षिततेच्या छायेत काम करत असल्याचेही पत्रात नमूद केले आहे.
पोलीस संरक्षण देण्याची मागणी
या घटनेनंतर जनगणना आणि फिल्डवरील सर्वेक्षणासाठी महिला कर्मचाऱ्यांना पोलीस किंवा सुरक्षा रक्षकांचे संरक्षण द्यावे, जनगणनेचे काम करताना कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास कुटुंबाला अतिरिक्त ५ कोटी रुपयांची आर्थिक मदत द्यावी, कर्तव्य बजावताना अपघात किंवा हिंसक हल्ल्यात कर्मचाऱ्याला अपंगत्व आल्यास वैद्यकीय खर्चासह ५० लाख रुपयांची विशेष आर्थिक मदत द्यावी, तसेच वाढती महागाई आणि इंधनदर लक्षात घेता कर्मचाऱ्यांना विशेष पेट्रोल भत्ता तातडीने लागू करावा, अशा मागण्या संघटनेने केल्या आहेत.




