Pune District : जनगणनेचे काम करून परतताना महिला शिक्षिकेचा अपघात; नेमकं काय घडलं?
Pune District : या घटनेमुळे शिक्षकांना इतक्या लांब अंतरावर ड्युटी देण्यासाठी कोणता निकष लावला, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.

जांबुत : शासकीय कामांचा बोजा आणि त्यातच प्रशासनाच्या चुकीच्या नियोजनाचा फटका पुन्हा एकदा एका महिला शिक्षिकेला बसला आहे. घर आणि शाळा सांभाळून तब्बल ४० किलोमीटर अंतरावर जनगणनेचे काम करण्यासाठी गेलेल्या पिंपरखेड येथील शिक्षिकेचा रात्री घरी परतताना अपघात झाला. यात त्यांचा हात फॅक्चर झाला आहे. या घटनेमुळे शिक्षकांना इतक्या लांब अंतरावर ड्युटी देण्यासाठी कोणता निकष लावला, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.
नेमका कसा झाला अपघात? (Pune District)
पिंपरखेड येथील श्री दत्त माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात कार्यरत असलेल्या शिक्षिका प्रियंका भोसले-दाभाडे यांना घर आणि शाळेपासून ४० किलोमीटर अंतरावर जनगणनेचे काम लावले होते. त्या सोमवारी (दि. १८) दिवसभर काम पूर्ण करून, रात्रीच्या वेळी त्या दुचाकीवरून घरी परतत होत्या. रात्री पावणे नऊ वाजेच्या सुमारास जांबूत (ता. शिरूर) येथे त्यांच्या दुचाकीला अपघात झाला.
या अपघातात भोसले यांचा हात फॅक्चर झाला आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. शिक्षकांना अशैक्षणिक कामात जुंपायचे आणि त्यातही कसलेही नियोजन नसते. यातून मानसिक व शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागते. प्रियंका भोसले यांच्या अपघाताला पूर्णपणे प्रशासनाचा चुकीचा निर्णय कारणीभूत आहे. तसेच या निर्णयामुळे महिलांच्या सुरक्षेचे काय, असाही प्रश्न शिक्षक वर्गातून विचारला जात आहे.





