Pune Rain News – मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह शहर आणि उपनगरांत झालेल्या धो-धो पावसाने पुणेकरांची दाणादाण उडवली. एक ते दीड तास शहराच्या अनेक भागांत ८० ते १०० मिमी पावसाची नोंद झाली असून, ढगफुटीसदृश पावसामुळे रस्ते जलमय झाले. सोसायट्यांसह बैठी घरे, दुकाने आणि कार्यालयांमध्ये पाणी घुसल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत खडकवासला परिसरात सर्वाधिक १०७ मिमी पावसाची नोंद झाली. सकाळपासून शहरातील आकाश निरभ्र आणि उन्हाचा चटका जाणवत होता. दुपारी दोनच्या सुमारास आकाशात काळे ढग भरून आल्याने भर दुपारी शहरासह उपनगरांत अंधार पसरला. Pune Rain क्षणात विजांचा कडकडाट आणि ३० ते ४० ताशी वादळी वाऱ्यासह धो-धो पावसाला सुरवात झाली. १०-१५ मिनिटे पाऊस पडेल त्यानंतर थांबेल, असे वाटत असताना पावसाचा जोर आणखी वाढला. शिवाजीनगर, डेक्कन आणि पेठातील परिसरासह कोथरूड, खडकवासला, एनडीए, पाषाण, हवेली, वारजे, कात्रज, सिंहगड रस्ता, धायरी, औंध, हडपसर, कोरेगाव पार्क आणि लोहगाव परिसरात मुसळधार पाऊस झाला. कमी कालावधीत पडलेल्या या जोरदार पावसामुळे ओढे-नाले ओसंडून वाहू लागले. रस्ते जलमय झाले, तसेच अनेक सखल भागांतील घरांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे वाहने पाण्याखाली गेली आणि नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. अनेक ठिकाणी दुचाकी वाहने पाण्यासोबत वाहून गेल्याच्या घटनाही समोर आल्या, तर झाडपडीच्या आणि पाणी साचण्याच्या तक्रारी वाढल्या असून, मदतकार्य सुरू आहे. अवकाळी पाऊस महिलेचा दुर्दैवी मृत्यू : वादळी पावसामुळे शहरासह उपनगरांत झाडपडीच्या आणि होर्डिंग पडल्याच्या घटना घडल्या. त्यामध्ये सिंहगड रस्त्यावर होर्डिंगचा सांगाडा पडून घडलेल्या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला, तर झाडपडीच्या घटनेत दोन पादचारी जखमी झाले आहेत, तर अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे. शहरासह उपनगरांतील पाऊस : खडकवासला १०७, आंबेगाव-कात्रज ८७, डेक्कन ८५, एनडीए ८४, वारजे ८१, शिवाजीनगर, ६५, हडपसर ४३, पाषाण ३७, चिंचवड ३०, मिलिमीटर. हे देखील वाचा : Pune Unseasonal Rains: पुण्यात अवकाळी पावसाचा पहिला बळी; झाड कोसळून महिलेचा मृत्यू, दोघे जखमी