Pune Palkhi Sohala: पुण्यनगरीत भक्तीचा महापूर! ज्ञानोबा-तुकारामांच्या जयघोषात दोन्ही पालख्या पुण्यात विसावल्या
Pune Palkhi Sohala: नऊवारी साडी, कपाळी बुक्का आणि डोक्यावर तुळशी वृंदावन; पुण्याच्या मध्यवर्ती भागात पारंपरिक वेषभूषेतील तरुणाईचा वारीत मोठा सहभाग.

Pune Palkhi Sohala – पंढरीची वाट, चालतांना वाटे गोड, विठ्ठल नामाचा, लागला छंद…, या ओवीप्रमाणे ज्ञानोबा-तुकाराम जयघोषात संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आज (दि. ९) पुण्यात मुक्कामी विसावला. हा नयनरम्य सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी शहरासह उपनगरांतून लाखो भाविकांचा जनसागर उसळला. वाकडेवाडी, संचेती चौक, फर्ग्युसन रस्ता, अलका चौक आणि लक्ष्मी रस्त्यावर भाविकांनी दर्शनासाठी अलोट गर्दी केली होती.
स्वागतासाठी जागोजागी रांगोळ्यांची आरास आणि पुष्पवृष्टी करण्यात आली. सेवेकरांना चहा, पाणी, नाष्टा आणि पावसाळी साहित्यासह आरोग्यसेवा दिली जात होती. अनेक तरुण-तरुणी पारंपरिक नऊवारी साडी, नाकात नथ आणि डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन वारीत उत्साहाने सहभागी झाले होते. यंदाच्या वारीचे मुख्य आकर्षण लहान मुलांचे विठ्ठलरूप ठरले.
पालकांनी चिमुकल्यांना वारकरी, माऊली, तुकाराम आणि विठ्ठल-रुक्मिणीच्या पेहरावात आणले होते. फर्ग्युसन रस्त्यावर या बाल-वारकऱ्यांच्या फोटोसेशनसाठी मोठी लगबग सुरू होती. वारीत चालून थकलेली ही लेकरे जेव्हा आई-वडिलांच्या खांद्यावर डोके ठेवून शांत झोपली, ती मनमोहक दृश्ये पाहून प्रत्येक भाविकाचे मन गहिवरून येत होते.
दिंड्या थेट पुण्यात…
मुसळधार पावसामुळे आळंदीत गर्दी न करता दिंड्यांनी थेट पुण्यात यावे, असे आवाहन देवस्थानने केले होते. त्यानुसार अनेक दिंड्या एक दिवस आधीच थेट पुण्यात दाखल झाल्या होत्या. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी पालख्यांचे तंबू, कीर्तन, अभंग, हरिपाठ आणि महाप्रसादाच्या पंगतींचे भक्तीमय चित्र पाहायला मिळाले. पुढील १४ दिवसांच्या प्रवासासाठी लागणारे जीवनावश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी वारकऱ्यांनी शहरातील मुख्य बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी केली होती, ज्यामुळे बाजारपेठा गजबजून गेल्या.
दिंड्यांसह पावसाची विश्रांती…
मुसळधार पावसामुळे गेल्या आठ दिवसांत अनेक दिंड्या देहू-आळंदीऐवजी पुण्यात थांबल्या होत्या. मुक्कामाच्या दिवशी पाऊस जोरदार बरसणार की उघडीप देणार याची सर्वांनाच धाकधूक होती. मात्र, वरुणराजाने विश्रांती घेत पालखी सोहळ्यासाठी वारकरी आणि पुणेकरांना मोठा दिलासा दिला. दुपारी काही भागात हलक्या सरी पडल्या. मात्र, शहराच्या मध्यवर्ती भागात पालखी आगमनानंतर हवामान कोरडे राहिले. यामुळे अनुकूल वातावरण मिळताच भाविकांनी संध्याकाळी दर्शनासाठी मुक्कामाच्या ठिकाणी गर्दी केली.






