Dehugaon : चला पंढरीसी जाऊं । रखुमादेवीवरा पाहूं; संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे प्रस्थान
Dehugaon : संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे प्रस्थान

देहूगाव – चला पंढरीसी जाऊं । रखुमादेवीवरा पाहूं ॥१॥
डोळे निवतील कान । मना तेथें समाधान ॥ध्रु.॥
संतां महंतां होतील भेटी । आनंदें नाचों वाळवंटीं ॥२॥
तें तीर्थांचे माहेर । सर्वसुखाचें भांडार ॥३॥
जन्म नाहीं रे आणीक । तुका म्हणे माझी भाक
या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचा प्रत्यय देणाऱ्या जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या ३४१ व्या आषाढी पालखी सोहळ्याचे प्रस्थान झाले.
टाळ-मृदंगाचा निनाद, ज्ञानोबा-तुकाराम आणि पुंडलिका वरदा हरि विठ्ठलच्या जयघोषाने देहूनगरी विठ्ठलमय झाली. हजारो वारकरी, दिंडीकरी आणि भाविकांच्या उपस्थितीत पालखी सोहळ्याची सुरुवात उत्साहपूर्ण वातावरणात झाली.
संत तुकाराम महाराजांचे सुपुत्र तपोनिधी नारायण महाराज यांनी इ.स. १६८५ मध्ये सुरू केलेल्या पालखी परंपरेचे यंदा ३४१ वे वर्ष आहे. या ऐतिहासिक परंपरेचे साक्षीदार होण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक देहूत दाखल झाले होते. पहाटेपासूनच मुख्य मंदिर, जन्मस्थान मंदिर, वैकुंठस्थान, शिळा मंदिर तसेच तपोनिधी नारायण महाराज समाधी मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या.
पहाटे श्री विठ्ठल-रुक्मिणी, संत तुकाराम महाराज शिळा मंदिर, वैकुंठस्थान आणि तपोनिधी नारायण महाराज समाधी मंदिरात संस्थानचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे, पालखी सोहळा प्रमुख विक्रमसिंह महाराज मोरे, लक्ष्मण महाराज मोरे, उमेश महाराज मोरे, विश्वस्त दिलीप महाराज मोरे, वैभव महाराज मोरे आणि गणेश महाराज मोरे यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. भजनी मंडपातील अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता ह.भ.प. देहूकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली.
सकाळी अकरा वाजता घोडेकर सराफ यांच्याकडे चकाकी करून आणलेल्या संत तुकाराम महाराजांच्या पादुका मानकरी म्हसलेकर कुटुंबीयांनी डोक्यावर घेऊन इनामदार वाड्यात आणल्या. यावेळी ह.भ.प. दिलीप गोसावी (मोरे) यांच्या हस्ते पादुकांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर पादुका मुख्य मंदिरात आणून प्रदक्षिणा घालण्यात आली आणि भजनी मंडपात विराजमान करण्यात आल्या.
दुपारी अडीचच्या सुमारास पालखी प्रस्थान सोहळ्यास सुरुवात झाली. मानकरी आजामेळा यादव दिंडीतील ज्येष्ठ वारकरी, उपमुख्यमंत्री सुमित्रा पवार, युवराज संभाजीराजे छत्रपती व संयोगिताराजे छत्रपती, खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते वेदमंत्रोच्चारात पादुकांचे महापूजन आणि कलशपूजन करण्यात आले.
यावेळी संस्थानचे पदाधिकारी, महाराजांचे वंशज, प्रमुख दिंड्यांचे विणेकरी, आमदार महेश लांडगे, आमदार सुनील शेळके, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त विजय सूर्यवंशी, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी, उपविभागीय अधिकारी यशवंत माने
तहसीलदार जयराज देशमुख, पोलीस उपायुक्त प्रदीप जाधव, देहू नगरपंचायतीचे मुख्याधिकारी चेतन कोंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, नगराध्यक्ष पूजा दिवटे तसेच विविध विभागांचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
महापूजेनंतर संत तुकाराम महाराजांच्या पादुका पालखीत विराजमान करण्यात आल्या. मानकरी आणि विणेकरांचा फेटा आणि श्रीफळ देऊन संस्थानतर्फे सन्मान करण्यात आला. त्यानंतर पालखीने टाळ-मृदंगाच्या गजरात पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले.
पालखी खांद्यावर घेताच पुंडलिका वरदा हरि विठ्ठलच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. आज (दि. ८) सकाळी शासकीय महापूजेनंतर पालखी सोहळा पंढरपूरकडे पुढील प्रवासासाठी मार्गस्थ होणार असून दुसरा मुक्काम आकुर्डी येथील विठ्ठल मंदिरात होणार आहे.
पालखीचा क्रम
पालखीच्या अग्रभागी संबळ, गोंधळी, चौघडा, शिंग, ताशा, अब्दागिरी, गरुडटक्के, पताका आणि जरीपटका यांसह बाभुळगावकर आणि मोहिते-पाटील यांच्या अश्वांचा पारंपरिक लवाजमा होता. दोन अश्व, विणेकरी, टाळकरी, पखवाज वादक, दिंडीकरी आणि हजारो वारकरी हरिनामाचा गजर करत पालखीसमवेत मार्गक्रमण करत होते. सायंकाळी मंदिर प्रदक्षिणेनंतर पालखी देहूतील पहिल्या मुक्कामासाठी इनामदार वाड्यात दाखल झाली.





