PMC News: भाजप-राष्ट्रवादीचे बिनसले! महापालिकेत दिवसभर हातात हात, सायंकाळी सभेत जोरदार वाद
PMC News: पीएमपीएमएलमधील कथित बढती घोटाळ्याच्या चौकशी अहवालावरून महापालिकेच्या मुख्यसभेत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार खडाजंगी.

PMC News – पीएमपीएमएलमधील कथित बढती घोटाळा प्रकरणाच्या चौकशी अहवालावरून महापालिकेच्या मुख्यसभेत सभागृहनेते गणेश बिडकर आणि विरोधी पक्षनेते ॲड. निलेश निकम यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. निकम यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने यांनी बढती घोटाळ्याचा चौकशी अहवाल सभेत सादर करण्याची मागणी केली.
मात्र, भाजपने ही मागणी फेटाळून लावल्याने दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. त्यानंतर निकम यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी सभात्याग केला. पीएमपीएमएलला वार्षिक संचालन तूट देण्यासाठी आयोजित केलेल्या सभेत विरोधी पक्षनेते निकम यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी बढती प्रकरणात मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला.
यात अनेक जण दोषी असून पीएमपीएमएलच्या संचालन तुटीची रक्कम महापालिका देत असल्याने चौकशी अहवाल मुख्यसभेत सादर करण्याची मागणी केली. त्यावर आव्हाड यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही. यामुळे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांना खुलासा करावा लागला. हा अहवाल गोपनीय असून शासनस्तरावर चौकशी सुरू असल्याने तो मुख्यसभेत सादर करता येणार नाही.
मात्र, तो खासगीत दाखविण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. त्यावर निकम यांनी आक्षेप घेत हा अहवाल सर्व नगरसेवकांना उपलब्ध करून द्यावा, असा आग्रह धरला. मात्र, सभागृहनेते बिडकर यांनी त्याला विरोध करत शासनाच्या प्रक्रियेत महापालिकेला हस्तक्षेप करता येणार नसल्याचे सांगून ही मागणी फेटाळली. त्यानंतर आक्रमक निकम यांनी सभात्यागाची घोषणा केली.
यावेळी बिडकर यांनी, तुम्ही पत्रकारांनी बातमी छापावी म्हणून सभात्याग करत असल्याची टीका केली. या विधानाने निकम यांच्यासह राष्ट्रवादीचे नगरसेवक संतप्त झाले. आम्ही बातम्यांसाठी नव्हे, तर पुणेकरांसाठी काम करतो. भाजप बढती घोटाळ्यातील दोषींना वाचवत आहे, असा आरोप करत बिडकर यांनी वक्तव्य मागे घ्यावे अशी मागणी केली.
बिडकर आपल्या वक्तव्यावर ठाम राहिल्याने निकम नगरसेवकांसह बाहेर पडले. सकाळच्या सत्रात काँग्रेससह महाविकास आघाडीने केंद्रीयमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलन केले. मात्र, या आंदोलनावेळी राष्ट्रवादीने भाजपला साथ देताना तटस्थ भूमिका घेतली होती. मात्र, संध्याकाळी दोन्ही नेत्यांमध्ये चांगलाच वाद झाल्याने महापालिकेत दोन्ही पक्षांचे बिनसल्याची चर्चा रंगली होती.






