BJP News : भाजपला मोठा धक्का ! ‘या’ महिला नेत्याचा तडकाफडकी राजीनामा
कोकणातील राजकीय वर्तुळातून एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी (BJP News) समोर आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ नगरपंचायतमधील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे.

BJP News : कोकणातील राजकीय वर्तुळातून एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी (BJP News) समोर आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ नगरपंचायतमधील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे.
भाजपच्या (BJP News) ज्येष्ठ नगरसेविका संध्या प्रसाद तेरसे यांनी आपल्या नगरसेवकपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला असून पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ केला आहे. त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकृतपणे आपले राजीनामा पत्र सादर केले आहे. संध्या तेरसे यांनी घेतलेल्या या आक्रमक निर्णयामुळे आणि प्रशासनावर केलेल्या गंभीर आरोपांमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कुडाळ नगरपंचायतीच्या मालकीची हिंदु कॉलनी येथील तब्बल १४१ गुंठे जमीन नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे नगरपंचायतीच्या ताब्यातून निसटल्याचा अत्यंत गंभीर आरोप संध्या तेरसे यांनी केला आहे. ही बहुमूल्य जमीन पूर्ववत नगरपंचायतीच्या ताब्यात मिळावी, यासाठी त्यांनी गेल्या काही काळापासून तीव्र लढा उभारला होता.
या लढ्याचा भाग म्हणून त्यांनी १० जुलै रोजी नगरपंचायतीच्या इमारतीसमोर आमरण उपोषणही केले होते. त्यांच्या या जनहिताच्या लढ्याला कुडाळमधील सर्वपक्षीय नेत्यांनी आणि नागरिकांनी उघड पाठिंबा दर्शवला होता.
नगरपंचायतीच्या विशेष सभेतही संध्या तेरसे यांनी या जमीन गैरव्यवहाराप्रकरणी सत्ताधारी आणि प्रशासनाला धारेवर धरत आक्रमक भूमिका घेतली होती. तसेच सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली होती.
मात्र, इतका पाठपुरावा करूनही या कथित जमीन गैरव्यवहारात प्रशासनाकडून कोणतीही ठोस पावले उचलली गेली नाहीत किंवा दोषींवर कारवाई झाली नाही. प्रशासकीय अनास्था आणि दुर्लक्षामुळे अत्यंत हताश होऊन अखेर त्यांनी आपल्या पदाचा त्याग करण्याचा मार्ग निवडला.
संध्या तेरसे यांच्या या राजीनाम्यामुळे (BJP News) कुडाळ भाजपमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली असून स्थानिक राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजपला रामराम ठोकल्यानंतर आता संध्या तेरसे नेमकी कोणती राजकीय दिशा निवडणार आणि कोणत्या पक्षात प्रवेश करणार, याबद्दल त्यांनी अजून आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






