Pimpri Chinchwad Police : पोलीस आयुक्तालयात ‘नो हेल्मेट, नो एन्ट्री’! पोलिसांवरच होणार दुहेरी कारवाई..वाचा सविस्तर
Pimpri Chinchwad Police : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या प्रवेशद्वारावर कडक नाकेबंदी; विनाहेल्मेट कर्मचाऱ्यांना गेटवरूनच माघारी धाडले.

Pimpri Chinchwad Police – पिंपरी-चिंचवड शहरात वाहतूक शिस्तीबाबत पोलीस दलाने स्वतःपासून कडक पाऊल उचलले आहे. हेल्मेटचा वापर बंधनकारक करण्यासाठी पोलीस आयुक्तालयाच्या प्रवेशद्वारावर कठोर नियम लागू करण्यात आले आहेत. आता हेल्मेटशिवाय येणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना थेट प्रवेश नाकारला जात आहे. या निर्णयामुळे पोलीस दलात शिस्तीचा नवा संदेश दिला गेला आहे. नव्या आदेशानुसार, विनाहेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या कर्मचाऱ्यांवर दुहेरी कारवाई केली जाणार आहे.
प्रथम मोटार वाहन नियमांनुसार तात्काळ दंड आकारला जाईल. त्यानंतर संबंधित कर्मचाऱ्याच्या सेवापुस्तकात अधिकृत नोंद केली जाईल. ही नोंद भविष्यातील पदोन्नती, वेतनवाढ आणि अन्य सेवाविषयक लाभांवर परिणाम करू शकते. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये याबाबत गंभीरता निर्माण झाली आहे. आयुक्तालयाच्या प्रवेशद्वारावर ’हेल्मेटशिवाय प्रवेश नाही’ असा फलक लावून सक्त तपासणी सुरू करण्यात आली आहे.
प्रत्येक दुचाकीस्वाराची पडताळणी केली जाते. हेल्मेट नसल्यास प्रवेश रोखला जातो. अनेकदा वरिष्ठ अधिकारी स्वतः तपासणी करत असल्याचेही दिसून येत आहे. यामुळे नियमांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे होत आहे. यासोबतच, शहरात कुठेही पोलीस कर्मचारी विनाहेल्मेट आढळल्यास त्याच्यावर कारवाई केली जाणार आहे. सोशल मीडियावर नागरिकांनी शेअर केलेले फोटो किंवा व्हिडिओही पुरावा म्हणून स्वीकारले जातील.
त्यामुळे पोलीस दलावर सतत लक्ष ठेवले जाणार असून, नियमभंग टाळण्यासाठी दबाव वाढला आहे. राज्यातील रस्ते अपघातांमध्ये दुचाकीस्वारांचे प्रमाण चिंताजनक आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये हेल्मेट वापराचे प्रमाण कमी असल्याचे वारंवार निदर्शनास आले आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी पोलिसांनी स्वतः आदर्श घालून देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. “प्रथम स्वतः शिस्त पाळा, मग नागरिकांकडून अपेक्षा ठेवा,” हा संदेश या निर्णयातून स्पष्टपणे दिला जात आहे.
दरम्यान, शहरातील काही पोलीस ठाण्यांमध्ये अंमलबजावणी सैल असल्याची चर्चा आहे. मात्र, हा उपक्रम सातत्याने आणि प्रभावीपणे राबवला जाईल, असा दावा पोलीस प्रशासनाकडून करण्यात आला आहे. या निर्णयामुळे नागरिकांमध्येही हेल्मेट वापराबाबत जागरूकता वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. पोलीस दलाकडून राबविण्यात येणारी ही मोहीम केवळ नियमांची अंमलबजावणी नाही, तर रस्ते सुरक्षा संस्कृती निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. नागरिकांनीही या उपक्रमाला प्रतिसाद देत स्वतःच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेटचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
पोलीस आणि महापालिकेत उल्टापुल्टा सुरू
यापूर्वी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी महापालिका मुख्यालयात प्रवेश करण्यासाठी कर्मचा-यासह नागरिकांना हेल्मेट सक्ती लागू केली होती. मात्र त्यांची बदली होताच हा नियम बासनात गुंडाळण्यात आला. मात्र आता पोलीस आयुक्तालयात हेल्मेटशिवाय प्रवेश बंद करण्यात आला आहे. तर दुसरीकडे प्रशासकीय राजवटीत महापालिकेने जनसंवाद सुरू केला होता. निवडणुकीनंतर हा संवाद महापालिकेने बंद केला आहे. तर दुसरीकडे पोलीस आयुक्तांनी नागरिकांशी संवाद सुरू केला आहे.






