PCMC Mission Sandhi : दिव्यांग बांधवांच्या भविष्यासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये मोठे पाऊल; काय आहे ‘मिशन संधी’? जाणून घ्या
PCMC Mission Sandhi : पिंपरी-चिंचवड महापालिका आणि दिव्यांग भवन फाऊंडेशनचा पुढाकार; हॉटेल सयाजी येथे कॉर्पोरेट क्षेत्रातील दिग्गजांच्या उपस्थितीत 'मिशन संधी'चा शुभारंभ.

PCMC Mission Sandhi- पिंपरी चिंचवड महापालिका दिव्यांग भवन फाऊंडेशन यांच्या वतीने मिशन संधी आरंभ या उपक्रमाचे आयोजन सोमवारी (दि. ४) वाकड येथील हॉटेल सयाजी येथे करण्यात आले आहे. दिव्यांग बांधवांसाठी स्वयंपूर्ण व शाश्वत एम्प्लॉयर इकोसिस्टम उभारण्याच्या उद्देशाने वर्षभर चालणाऱ्या मोहिमेची ही सुरुवात आहे. मिशन संधी आरंभ अंतर्गत कॉर्पोरेट क्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी, एचआर,
सीएसआर प्रमुख, स्वयंसेवी संस्था (एनजीओ), सामाजिक कार्यकर्ते तसेच शासकीय अधिकारी यांना दिव्यांग समावेशन व रोजगार या विषयावर संवादासाठी एकत्र आणण्यात येणार आहे. हा उपक्रम केवळ चर्चेपुरता मर्यादित नसून, प्रत्येक सहभागी संस्थेकडून दिव्यांगांच्या उपजीविकेसाठी औपचारिक प्रतिज्ञा घेण्यात येणार आहे. हा उपक्रम महापौर रवि लांडगे तसेच आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येत आहे.
समावेशक विकासासाठी त्यांची असलेली बांधिलकी या उपक्रमातून अधोरेखित होत आहे. इन्क्लुझ्झा, बेंगळुरू ही संस्था नॉलेज पार्टनर म्हणून कार्यरत असून, दिव्यांग समावेशन आणि ऑपर्च्युनिटी मॉडेल संदर्भात मार्गदर्शन करणार आहे. याशिवाय, रोहिणी पीपल टेक्नॉलॉजी प्रा. लि. ही संस्था इम्प्लिमेंटेशन पार्टनर म्हणून कार्य पाहणार असून, कॉर्पोरेट संपर्क, सहभाग समन्वय व प्रत्यक्ष अंमलबजावणीची जबाबदारी पार पाडणार आहे.
संधी संकल्पनेद्वारे कॉर्पोरेट क्षेत्राद्वारे दिव्यांगांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या माध्यमातून त्यांना रोजगार, इंटर्नशिप, प्रोक्युअरमेंट आणि लीडरशिप या सर्व स्तरांवर दिव्यांगांचा समावेश करण्यासाठी व्यावहारिक मार्ग उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
प्रत्येक नागरिकाला समान संधी मिळेल असे शहर उभारण्याचा आमचा संकल्प आहे. ‘मिशन संधी’ हा उपक्रम समावेशक रोजगाराच्या दिशेने उचललेला महत्त्वपूर्ण टप्पा असून, याच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यास निश्चितच गती मिळेल.
– डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका






